Maratha Reservation: जरांगे फडणवीसांच्या बंगल्याकडे

अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी रविवारी बोलावलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले.

Manoj Jarange Patil

संग्रहित छायाचित्र

फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप, एन्काऊंटरचा प्रयत्न असल्याचा आरोप

अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी रविवारी बोलावलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. फडणवीस मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी कट रचत आहेत. सलाईनमध्ये विष देऊन मला मारण्याचा त्यांचा विचार आहे. माझा एन्काऊंटर करण्याचाही त्यांचा प्रयत्न असल्याचे गंभीर आरोप जरांगे यांनी केले आहेत.बैठकीनंतर ते मुंबईतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले. ते मराठा आंदोलकांना उद्देशून म्हणाले, फडणवीसांनी कितीही कारस्थाने केली तरी मी घाबरणार नाही. फडणवीसांचा ब्राह्मणी कावा चालू देणार नाही.

फडणवीसांवर दबावाचा आरोप 

यावेळी जरांगे यांनी राज्यात घडलेल्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडींचा पाढाच वाचला. फडणवीसांनी अनेक नेत्यांवर दबाव टाकला असे सांगून ते म्हणाले की, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय. यामागे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर राज्यात काहीच होऊ शकत नाही. फडणवीसांचे ऐकले नाही तर काय होते, ते तुम्हाला सांगतो. जो माणूस स्वत:चा पक्ष कधीच सोडू शकत नाही, अशा लोकांवर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. एकनाथ खडसे यांच्यावर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. विनोद तावडे महाराष्ट्रातून कधीच बाहेर जाणार नव्हते. मात्र त्यांना दिल्लीला जावे लागले. नाना पटोले यांनादेखील फडणवीसांमुळे भाजपा सोडावा लागला. पंकजा मुंडे आयुष्यात कधीही भाजपा सोडण्याचा विचार करू शकत नाहीत. मात्र भाजपात त्यांची घुसमट होत आहे. फडणवीस हे महादेव जानकर यांना धनगरांचा नेता म्हणून मोठं होऊ देत नाहीत. 

सागर बंगल्याची सुरक्षा वाढवली 

मनोज जरांगे पाटील आता आंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. यामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सागर बंगल्याबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जरांगेंच्या आक्रमक भूमिकेनंतर आता पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर सागर बंगल्याभोवती सुरक्षाकडे अधिक कडक करण्यात आले आहे. सागर बंगल्याचा सुरक्षेचा आढावा डीसीपी मोहितकुमार गर्ग यांनी घेतला आहे. उच्चस्तरीय पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे.

जरांगेंच्या इशाऱ्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे. पार्क केलेल्या गाड्या हटवण्यात आल्या आहेत. आता सागर बंगल्यासंदर्भात हाय अलर्ट देण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीला येथे थांबण्यास मज्जाव केला जात आहे.

“ब्राह्मणी कावा थांबवला नाही तर…”

फडणवीस यांच्याविषयी जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस कोण आहेत, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. एकी झालेल्या मराठ्यांशी ते कसे वागतात हे मला तुम्हाला सांगायचे आहे. मला ही माहिती फडणवीसांच्या जवळच्या लोकांनी सांगितली. माझ्याविरोधात फडणवीस बदनामीचे षडयंत्र वापरतील. मी ज्यांची नावे घेत आहे, त्यांनी हे सगळं मान्य करायला हवं. ब्राह्मणी कावा मी माझ्याविरोधात चालू देणार नाही. मनोज जरांगे हे मराठ्याचं पोर आहे. हा ब्राह्मणी कावा जर नाही थांबवला तर मी माझं नाव बदलतो, असेही मनोज जरांगे फडणवीसांना उद्देशून म्हणाले. तसेच मी बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पायी जाणार आहे. मी रस्त्यात मेलो तर मला फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर नेऊन टाका, असेही आवाहन मराठा आंदोलकांना केले. फडणवीसांनी काय आरोप करायचे ते करावे. पण मी मराठ्यांना सोडणार नाही. मला फडणवीस या नेत्यांच्या पंक्तीत बसवत आहेत. मी मरायला तयार आहे. फडणवीस हे मनोज जरांगेंच्या नादी लागले आहेत, असेही जरांगे म्हणाले. 

सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न 

हे राज्य एकनाथ शिंदे किंवा अजित पवार नव्हे तर देवेंद्र फडणवीस चालवत असल्याचे सांगून जरांगे पाटील म्हणाले, ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामागे केवळ देवेंद्र फडणवीसच आहेत. त्यांनी ठरवलं तर काही वेळात सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईल. फडणवीस हे होऊ देत नाहीत. ते मला जिवे मारण्याचा कट रचत आहेत. मला सलाईनमधून विष पाजून मारण्याचा कट रचला. त्यामुळेच मी परवापासून सलाईन घेणंही बंद केलं आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मला मारायचंच असेल, तर येतो मी सागर बंगल्यावर, मला मारून दाखवा. मी आता चालत सागर बंगल्यावर जातो. तेथे उपोषण करेन. जर रस्त्यात मी मेलो, तर फडणवीसांच्या बंगल्यावर नेऊन टाका. आता मी एकतर मराठा आरक्षणाचा गुलाल तरी घेऊन येतो, नाहीतर देवेंद्र फडणवीसांना माझा बळी तरी देतो, असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत टीकास्र सोडले.

मराठ्यांचा राज्यात दरारा निर्माण झाला आहे. हा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाही. १० टक्के आरक्षण मराठ्यांवर लादले जात आहे. मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातो. मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरू द्यावे, यासाठी प्रयत्न केला जातोय. 

मी आज तुम्हाला सगळे काही सांगणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना एवढीच खुमखुमी आहे ना तर ही बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. मला त्यांनी मारून दाखवावं.

जरांगे सागर बंगल्याकडे 

भाषण सुरू असतानाच मनोज जरांगे आक्रमक झाले. देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी हवा आहे. त्यामुळे मी सागर बंगल्यावर जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठक चालू असताना मनोज जरांगे देवद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर निघाले. मराठा समाज त्यांची समजूत काढत होते. मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी सागर बंगल्यावर येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मारून दाखवावं, असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी दिले. या सगळ्यामागे फडणवीस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मी कोणत्याही पक्षाचा नाही. कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मी माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे. मराठ्यांना-मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव असल्याचेही ते म्हणाले.

... तर पोलिसांना कारवाई करावी लागेल -फडणवीस 

जरांगेंनी केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल, या शब्दात फडणवीस  यांनी जरांगेंच्या आरोपांना उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, सागर बंगला हा सरकारचा आहे. सरकारी काम घेऊन कोणीही या बंगल्यावर येऊ शकतो. मनोज जरांगे हे कोणत्या निराशेतून बोलत आहेत. त्यांना कोणती सहानुभूती घ्यायची आहे, याची मला कल्पना नाही. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मराठा आरक्षणासाठी मी काय केलं हे मराठा समाजाला माहिती आहे. मराठा आरक्षण मी उच्च न्यायालयात टिकवलेलं आहे. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकवलं.

शरद पवार, उद्धव ठाकरे यांची फूस असल्याचा अप्रत्यक्ष आरोप 

मनोज जरांगे यांना शरद पवार, उद्धव ठाकरे यांची फूस आहे, असा अप्रत्यक्ष आरोप फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, मनोज जरांगे जी स्क्रिप्ट बोलत आहेत, तीच स्क्रिप्ट याआधी उद्धव ठाकरे बोलत होते. ज्या स्क्रिप्टवर शरद पवार बोलत होते, नेमके तेच विषय मनोज जरांगे मांडत आहेत. त्यांनी हेच विषय का मांडावेत, असा प्रश्न मला पडला आहे. याच कारणामुळे जरांगेंच्या पाठीशी कोण आहे, याची काहीशी कल्पना आमच्याकडे आहे. योग्य वेळी ती बाहेर येईल. तूर्तास एवढंच आहे की कायदा, सुव्यवस्था न बिघडवता कोणीही आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही. मात्र कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल.

मनोज जरांगे पाटील व विरोधकांनी सरकारवर घेतलेल्या आक्षेपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मराठा समाजाचं खच्चीकरण करण्याचं काम कोण करतंय? याचा उलगडा जनतेसमोर लवकरच होईल. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही आमची आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये. काही लोकांचं अराजकता पसरवण्याचं कारस्थान आहे. हे कुणीही करता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या वारंवार बदलल्याचा मुद्दा नमूद केला. ते म्हणाले, जरांगे पाटील मराठा समाजासाठी प्रामाणिक भावना मनात ठेवून लढ्यात उतरले आहेत, अशी आमची भावना होती. त्यामुळे त्यांच्या मागण्यांवर आम्ही कार्यवाही केली. यावेळी आंदोलनात कुठे आग लावली, कुठे दगडफेक झाली. मराठा समाजाला गालबोट लावण्याचं काम जे कुणी करत असेल, त्यांच्यापासून सावध राहायला हवं. जरांगे पाटलांचीआत्ताची भाषा राजकीय वाटतेय. त्यांच्या मागे कुणीतरी ते सगळं बोलून घेतंय असा वास मला येतोय. “उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांबाबत खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. देवेंद्र फडणवीसांबाबत त्यांना आरोप करण्यासाठी कुणी सांगितलंय का? हे पाहायला हवं. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कुणी जबाबदार असतील, त्यांना सरकार पाठिशी घालणार नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest