Maratha Reservation: जरांगेंचे बोलविते धनी शरद पवार?

मुंबई: अजय महाराज बारसकर यांच्या पाठोपाठ आणखी एका मराठा आंदोलक महिलेने मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला वेड्यात काढले. अंतरवाली सराटीत दंगल का घडली आणि कुणाच्या आदेशानुसार घडली?

Maratha Reservation

संग्रहित छायाचित्र

मराठा आंदोलनात फूट, अजय महाराज बारसकरांच्या नंतर संगीता वानखेडेंचा मनोज जरांगे पाटलांवर घणाघात

मुंबई: अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांच्या पाठोपाठ आणखी एका मराठा आंदोलक महिलेने मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला वेड्यात काढले. अंतरवाली सराटीत दंगल का घडली आणि कुणाच्या आदेशानुसार घडली?  मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे असाही दावा संगीता वानखेडेंनी (Sangita Wankhede) केला. संगीता वानखेडे या मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलनात (Maratha Protest) कार्यरत होत्या. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर फारकत घेतल्यानंतर संगीता वानखेडेंनी त्यांच्यावर टीका केली आहे आणि आरोप केले आहेत.

महाराष्ट्राला मनोज जरांगेंनी वेड्यात काढले आहे. त्यांचे सुरुवातीपासून चुकतच आले आहे. सरकारने दंगल घडली की घडवली त्याचा शोध घेतला पाहिजे. पोलिसांनी जो लाठीचार्ज केला तेव्हा महाराष्ट्राचा उद्रेक दिसला. मनोज जरांगे पाटील कोण हे आधी मीडियाला माहीत नव्हते. लाठीचार्ज झाल्यानंतर त्यांना डोक्यावर घेतले. डॉ. प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळे त्यांना भेटले. त्यानंतर मनोज जरांगेंना लोकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळेच मी त्यांच्याशी जोडले होते. मनोज जरांगे साधासुधा माणूस, आपल्या भाषेत बोलणारा माणूस म्हणून महाराष्ट्राने आणि मी विश्वास ठेवला होता. मी एक महिन्यापूर्वीपर्यंत त्यांच्यासह होते. पण आता मी त्यांच्यासोबत नसल्याचे वानखेडे म्हणाल्या आहेत. (Maratha Reservation)

मनोज जरांगेंवर पहिल्यापासून संशय होताच

नामदेवराव जाधव यांच्यावर शाईफेक झाली तेव्हाही मनोज जरांगे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मंगेश साबळे कोण हे माहीत नाही असे सांगितले. मी या मनोज जरांगेची बाजू घेऊन भुजबळांना ट्रोल केले. मात्र माझ्याविषयी गलिच्छ भाषा वापरण्यात आली. मी तळतळीने बोलत होते. त्यावेळी मला फोन आले, फेसबुकवर फोन आले. संगीता वानखेडेला एकटी समजू नका इतके तरी बोलायचे होते. मात्र या बाबाचे वक्तव्य होते की मी त्या बाईला बोलायला सांगितले नव्हते. मला ती बाब खटकली, मला तेव्हा खूप मनस्ताप झाला. मी रेकॉर्डिंग ऐकले आहे त्यामुळे मी हे बोलते आहे. मनोज जरांगेंची गडबड आहे हे मलाही कळत होते. त्यामुळे मी साथ सोडली. मला उदयनराजेंच्या सहकारी फोन करत आहेत. छत्रपतींची गादी माझ्या पाठिशी आहे. मात्र हा माणूस सहानुभूती म्हणूनही काही बोलत नाही, असेही संगीता वानखेडे म्हणाल्या.

जरांगेंनी मराठा समाजाची फसवणूक केली

बारसकर महाराज यांनी जे सांगितले तेच बरोबर आहे. मनोज जरांगे पाटील कुणालाच विश्वासात घेत नव्हते. एक फोन यायचा आणि ते पुढची दिशा सांगायचे. तो फोन शरद पवारांचाच असणार दुसरे कोण असणार? शरद पवार त्यांच्यामागे आहेत. आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनी केला आहे. कालांतराने हे सत्य बाहेर येईल, असेही संगीता वानखेडे यांनी म्हटले आहे. माझे तोंड कुणी बंद करू शकणार नाही. बारसकर यांच्याकडे पुरावा आहे. जरांगे काल काय म्हणाले? हे तर एक-दोनच आहेत. अजून बाहेर येतील असे म्हणाले होते. लोक आता बाहेर येतील. यांची मते पटलेली नाही आणि लोक फुटलेत. त्यामुळे लोक बाहेर येणार आहेत. मनोज जरांगेंनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला नीट उत्तर दिले नाही. शरद पवार जेव्हा भेटायला गेले तेव्हा यांची भाषा बदलली होती. त्यावेळी मला वाटले होते, मराठ्यांना आरक्षण मिळतंय ना? चांगले होत आहे. म्हणून मी साथ दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले की हा लगेच गुन्हे मागे घेण्याची मागणी करतो, असाही आरोप संगीता वानखेडे यांनी केला. जे शरद पवारांना हवे आहे तेच या माणसाला पाहिजे आहे. या सगळ्यामागे शरद पवार आहेत. कारण शरद पवारांचा पक्ष संपला आहे. त्यामुळे राडा, गोंधळ आणि राडा घातला जातो आहे. शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच मनोज जरांगे वागतो, असाही आरोप संगीता वानखेडेंनी केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest