मुंबई: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आक्रमक होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर टीकेवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे म्हणाले, जरांगेंचे आंदोलन मराठा आरक्षणासाठी आहे की, देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी? त्यांनी हा लढा कशासाठी सुरू केला होता? जरांगे जी स्क्रिप्ट वाचतात ती कुणाची आहे? आम्हाला या स्क्रिप्टमधून तुतारीचा वास यायला लागला आहे. हा लढा मराठा समाजाचा असेल तर तो लढा मराठा समाजापर्यंत मर्यादित ठेवावा. जर त्यांनी आमच्या नेत्यावर आरोप करण्याचं राजकारण केलं आणि खालच्या पातळीवर येऊन टीका केली, तर सागर बंगल्याची भिंतही त्यांना ओलांडता येणार नाही.
मला विचार पडला आहे की, जरांगे यांना स्क्रिप्ट देते कोण? आरोप करण्यामागे काय पार्श्वभूमी आहे. नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी काय केले आहे. मनोज जरांगे सागर बंगल्यावर येणार असतील तर आम्ही काय गप्प बसणार आहोत का? आम्हीपण मराठे आहोत. राजकारण करू नका, सगेसोयऱ्यांची मागणी आहे, तर त्यावर मार्ग निघेल. ऊठ-सूट फडणवीसांवर टीका करता, धमक्या देता, हे कसे चालेल? सागर बंगल्याआधी आमची भिंत आहे, ती क्रॉस करून दाखवा, मग पुढचं बघू, असा इशाराही राणे यांनी दिला आहे. मनोज जरांगे उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यावर का टीका करत नाहीत. फक्त फडणवीसांवर का टीका करतात, असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला.