संग्रहित छायाचित्र
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्याकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी तूर्त आंदोलन मागे घेतले असून अंतरवाली सराटीला परतले आहेत. त्यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली असून उद्यापासून धरणे, साखळी उपोषण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून जालना-बीडच्या सीमा सील केल्या आहेत. तसेच इंटरनेटवरही काही काळासाठी बंदी घातली आहे. (Maratha Reservation News)
हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेतल्यानंतर दोन-तीन दिवसांनंतर ते पुन्हा राज्याचा दौरा करणार आहेत. संचारबंदीमुळे लोकांना भेटता येत नसल्याने ते स्वत: लोकांच्या भेटी घेणार आहेत. यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केले. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत.
मनोज जरांगेंनी काल आंतरवाली सराटीमध्ये आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर ते सागर बंगल्याकडे रवाना झाले. मात्र, संचारबंदी लागू झाल्यानंतर जरांगे यांनी पुन्हा आंतरवाली सराटीकडे जाण्याचा निर्णय घेतला.
भांबरी येथे जरांगे पाटील म्हणाले की, फडणवीसांचा नाही पण कायद्याचा मान राखतोय. सगळ्यांनी राज्यात शांत राहायचं आहे. अंतरवाली सराटीमध्ये जाऊन चर्चा केल्यावर काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. मराठ्यांनी संयमाची भूमिका घ्यावी. अंबडमध्ये संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी उठत नाही, तोपर्यंत मुंबईकडे रवाना होणार नाही. परिस्थिती पाहून भूमिका घ्यावी लागते. हट्टीवादी भूमिका घेऊन लोकांना त्रासात आणायचं नाही. सागर बंगल्यावर येण्याचं निमंत्रण देऊन फडणवीसांनी चूक केली आहे. संचारबदी उठवली की लगेच मुंबईकडे येतो. तुमचा सन्मान म्हणून मी सलाईन लावून घेतो. संचारबंदी उठल्यानंतर सगळ्यांनी अंतरवली सराटीमध्ये यावं. आमच्या लोकांना त्यांनी ताब्यात घेतले आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करूनच घेणार. मराठ्यांवर अन्याय होतोय. मराठ्यांची लाट उसळू देऊ नको. मराठ्यांचा हकनाक बळी जाऊ द्यायचा नाही. (Manoj Jarange Patil)
तिर्थपुरी गावात बस पेटवली
जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. तिर्थपुरी गावात आज सकाळी अंबड येथून रामसगावकडे जाणाऱ्या अंबड आगाराच्या या बसला अडवून अज्ञातांनी ती पेटवून दिली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमधील इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आगारातील एसटी वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. या तिन्ही जिल्ह्यांमधील सर्व आगारातील वाहतूक तात्पुरत्या बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांना मनाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.