Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा कार्यकर्त्याचा मुंबईत उड्डाणपुलावर गळफास; सुसाईड नोट व्हायरल

मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी जालन्यातून मराठा आरक्षणासाठी(Maratha Reservation) एल्गार पुकारल्यानंतर आरक्षणाचा लढा अधिक व्यापक झाला असून राज्यभरात या आंदोलनाचे लोण पसरले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 20 Oct 2023
  • 01:08 pm
Maratha Reservation

जालन्यातील कावळेंनी आरक्षणासाठी संपवले जीवन

मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी जालन्यातून मराठा आरक्षणासाठी(Maratha Reservation) एल्गार पुकारल्यानंतर आरक्षणाचा लढा अधिक व्यापक झाला असून राज्यभरात या आंदोलनाचे लोण पसरले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय कार्यकर्ते सुनील बाबुराव कावळे (Sunil Baburao Kawle) यांनी मुंबईत आत्महत्या (suicide) केली आहे.

सुनील कावळे (४५ वर्षे ) असे आत्महत्या करणाऱ्या कार्यकर्त्याचे  नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. सुनील कावळे जालन्याचे रहिवासी होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट (Suicide note) सापडली आहे. या नोटमध्ये त्यांनी सर्वांची माफीदेखील मागितली आहे. मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट समोर आली आहे. त्यामध्ये ते लिहितात की, महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानी माता हिंदूधर्मरक्षरक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, जय भवानी जय शिवाजी, मी सुनील बाबुराव कावळे, मु. पो. चिकणगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना, असा पत्ता त्यांनी या पत्रामध्ये लिहिला आहे.

एकच मिशन, मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा...

साहेब आता कोण्या नेत्याच्या सभेला जायचे नाही. ऑक्टोबर २४ हा मराठा आरक्षण दिवस, या मुंबईमध्येच... आता माघार नाही. कोणी काहीही बोलू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांचे नाव तोंडातून काढू नका. आता फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी या मुंबईमध्ये उपोषणाला बसू. ऊठ मराठा जागा हो, पण लक्षात ठेवा, शांततेत यायचे आहे.  शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. 

मराठा शेतकरी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे. सण-वार काय येत राहतील, पण आता एकच मिशन मराठा आरक्षण. मला वाटले,  मी केले. मला मोठ्या मनाने माफ करा ! मी क्षमा मागतो. सर्वांनी मला माफ करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

आश्वासने दिलीत, आता पूर्तता करा

मराठा समाजाच्या तरुणाने आज कठोर भूमिका घेतली आहे. परंतु माझे समाजबांधवांना आवाहन आहे की, आपण जी लढाई लढत आहोत, ती लढत असताना टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी की आहे. एक तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी स्वतःचा जीव देतो, हे गंभीर आहे. सरकारने मराठा समाजाला जी काही आश्वासने दिलेली आहेत, त्याची त्वरित पूर्तता करावी आणि अशा घटना घडू नयेत, यासाठी सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी. मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला वेळ येत्या २४ तारखेला संपत आहे. त्यानंतर मराठा बांधव काय भूमिका घेतात, हे बघावे लागेल, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest