महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने येथे तुफान मारामारी
मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटनेची पाहणी करण्यासाठी राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह अन्य नेते आले असता तेथे ठाकरे समर्थक आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे, निलेश राणे समर्थकात तुफान राडा होऊन कार्यकर्ते परस्पराशी भीडले.
दरम्यान, या घटनेनंतर महाविकास आघाडीने १ सप्टेंबर रोजी महायुती सरकारविरोधात जोडा मारो आंदोलनाची घोषणा केली. विशेष म्हणजे, नारायण राणे यांनी यावेळी जाहीरपणे घरात घुसून एक-एकाला रात्रभर मारून टाकीन. सोडणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान, पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या निषेधार्थ मालवणमध्ये बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.
आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांसमवेत राजकोट किल्ल्यावर सर्वप्रथम आले. याचवेळी खासदार नारायण राणे, निलेश राणे समर्थकांसह किल्ल्यावर आले. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने येथे तुफान मारामारी, हाणामारी झाली. काहीवेळ राजकोट किल्ल्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन तासांच्या तणावानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते शांत झाले.
चिंधी चोर समोरून आले-आदित्य
महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपा नेते नारायण राणे यांच्यावर खोचक टीका केली. ते म्हणाले, खरे तर आज आपला मोर्चा होता. या मोर्चामध्ये काही चिंधी चोर समोरून आले. आता श्रावण सुरु आहे, अन्यथा त्यांच्या खिशातून कोंबड्याही काढल्या असत्या. जाऊ द्या मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. आज त्यांचा बालिशपणा होता. आम्ही येथे येणार हे समजल्यावर केवळ राजकारण करण्यासाठी येथे आले. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्यासाठी आलो होते. भाजपाने गेल्या १० वर्षात जे-जे काम केलं. तेथे गळती लागली.अयोध्येतील राम मंदिर असो किंवा नवीन संसद भवन असो एवढेच नाही तर दिल्ली विमानतळाचे छत देखील कोसळले.
एकही झाड पडले नाही-जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले, भ्रष्टाचारी लोकांनी उभा केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्दैवाने पडला. पुतळा उभारतानाही सरकारने भ्रष्टाचार केल्याने ही घटना घडली. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची परिस्थिती पाहिली की वाईट वाटते. ४५ किमी वारे वाहिले म्हणून पुतळा पडला, असे मुख्यमंत्री सांगतात. त्या दिवशी २८ किमी ताशी वेगाने वारे वाहत होते. एकही झाड या भागातले पडलं नाही. ज्या बाजूने वारा येत होता, त्याच बाजूला पुतळा. वादळ, वारं नसताना हा पुतळा कोसळला. मोठं वादळ असतं तर झाडांचीही पडझड झाली असती.
मात्र, तसं न होता केवळ पुतळा पडला. याचा अर्थ पुतळा सदोष होता. याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम आणि सरकारची आहे. मोठमोठी टेंडर काढून इव्हेंट करणं यांचं काम असून हे सरकार इव्हेंट जीवी आहे. मूर्तीकार आपटेंची कुवत नसाताना काम देणारा खरा दोषी आहे. दोन पुतळ्यांच्यावर त्यांनी कधी पुतळे केले नाहीत. आपटे शिल्पकाराचा पत्ता नौदलाला कसा समजला ? सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुढाकारातून हे सगळं झालेलं आहे. आपटे हा कल्याणचा निघाला. काम बांधकाम खात्यानेच करून घेतले. पुतळा बसविण्याच काम नौदलाने केलं.
मालवणमध्ये कडकडीत बंद
शिवपुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवणमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. बंदमध्ये मालवणमधील अनेक व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांनी सहभाग दर्शवत दुकाने बंद ठेवली. निषेध मोर्चात युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी सहभागी झाले.