संग्रहित छायाचित्र
मुंबई: राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (मानवाधिकार संरक्षण) कैसर खालिद (Quaiser Khalid) यांना घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी (Ghatkopar hoarding incident) गृह विभागाने निलंबित केले. खालिद हे रेल्वे पोलिस आयुक्त असताना त्यांनी या अवैध होर्डिंगला परवानगी दिली होती. वरिष्ठ आयपीएस अधिकारी निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गृह विभागाने कैसर खालिद यांच्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे की, खालिद यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आहे. होर्डिंगला परवानगी स्वतःच्या अखत्यारित देताना त्यांनी पोलिस महासंचालकांची मान्यता घेतली नव्हती. त्यांनी अधिकारांचा गैरवापर केला. होर्डिंग उभारण्याबाबतचे निकष, नियम यांची पायमल्ली केली गेली.त्याच काळात त्यांच्या पत्नीच्या कंपनीच्या बँक खात्यात होर्डिंग उभारणाऱ्या कंपनीकडून लाखो रुपये जमा करण्यात आल्याची सध्या चौकशी सुरू असताना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी अटकेत असलेल्या भावेश भिंडेच्या चौकशीमध्ये असे आढळले की त्याने मोहम्मद अर्शद खान या व्यक्तीच्या माध्यमातून कैसर खालिद यांची पत्नी सुम्मना खालिद यांच्या महापारा गारमेन्टस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या बँक खात्यात ४६ लाख रुपये २०२२-२३ मध्ये जमा केले. सुम्मना आणि अर्शदखान हे महापारा कंपनीचे संचालक आहेत. जून २०२२ मध्ये ही कंपनी सुरू झाली होती.