संग्रहित छायाचित्र
मुंबई : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. ती मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. मग्रुरीने माफी आम्हाला मान्य नाही. शिवरायांच्या पुतळ्याबाबतच्या चुकीला माफी नसल्याची जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. पुतळा कोसळल्याबद्दल महाविकास आघाडीने पुकारलेल्या जोडे मारो आंदोलनानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. त्यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, या भावनेने म्हणत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष सुरू होता. गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही, अशा घोषणाही कार्यकर्ते देत होते. मविआच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र रविवारचा दिवस असल्याने येथील कार्यालयांना सुटी असताना आंदोलनाला परवानगी का नाही, असा सवाल महाविकास आघाडीने केला. त्यानंतर हा मोर्चा अडवला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. लावलेले बॅरिकेड्स हटवण्यात आले.
महाविकास आघाडीने पुकारलेल्या जोडे मारो आंदोलनात सर्वश्री उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी भाग घेतला. उद्धव ठाकरे यांनी या चुकीला माफी नाही असे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा हवेतून कसा पडला? राज्यात भ्रष्टाचारात गुंतलेले सरकार सुरू आहे. स्मारकाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली करोडोंचा भ्रष्टाचार होणार आहे. मी त्यांना शिवाचा गद्दार म्हणेन. शिवरायांच्या पुतळ्याबाबतच्या चुकीला माफी नाही. आमच्या मनातील संताप व्यक्त करण्यासाठी येथे जमलो आहोत. आम्ही गेट वे ऑफ इंडिया म्हणजे देशाचं प्रवेशद्वार येथे जमलो आहे. शिवद्रोही सरकारला ‘गेट आऊट ऑफ इंडिया’ चा इशारा देण्यासाठी येथे जमलो आहेत.
पंतप्रधान महाराष्ट्रात आले आणि माफी मागितली. माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने शिल्लक ठेवले नसते, असे सांगून ठाकरे म्हणाले, माफी मागतानासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. मग्रुरीने माफी आम्हाला मान्य नाही. व्यासपीठावर एक शहाणा, दोन दीड शहाणे म्हणजे एक फुल – दोन हाफ बसले होते. त्यातील एक हाफ हसत होता. महाराजांची तुम्ही एवढी थट्टा करता. तुम्हाला काय वाटतं? मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली? पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरुण घालण्याकरता मागितली? निवडणुकीसाठी तुम्ही सिंधुदुर्गात आला होता. आम्हाला अभिमान वाटला होता की नौदल दिन महाराष्ट्रातील किनारपट्टीवर साजरा होत आहे. हा कार्यक्रम दिमाखदार झाला. त्यावेळेला घाईघाईने भ्रष्टाचार करून पुतळा बसवण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते की मोदी गॅरंटी. हीच ती मोदी गॅरंटी, हात लावीन तिथे माती होईल.
मुख्यमंत्र्यांचे विधान धक्कादायक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे कोसळल्याचे केलेले विधान धक्कादायक होते अशी टीका शरद पवारांनी यावेळी केली. ते म्हणाले, सध्याच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम केलं आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा वाऱ्यामुळे कोसळल्याचे धक्कादायक विधान केलं. गेट वे ऑफ इंडिया येथे शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या ५० वर्षांपासून लोकांना प्रेरणा देत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये असे अनेक पुतळे आहेत. मालवणमध्ये उभारलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना होता. राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या उभारणीमध्ये भ्रष्टाचार झाला हे सत्य आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. तसेच शिवप्रेमींचाही अपमान आहे. त्यामुळे हा अपमान ज्यांनी केला त्यांचा निषेध करण्यासाठी येथे आंदोलन करण्यात येत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सिंधुदुर्गात पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी स्वत: पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री आले होते. मूर्ती बनवण्याचा नियम आहे, परवानगी घ्यावी लागते. हे शिवविरोधी लोक आहेत.
'मविआ'स जनताच जोडे मारेल - मुख्यमंत्री
आजचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे. शिवाजी महाराज आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. घडलेल्या घटनेचं राजकारण करणं हे जास्त दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, कर्नाटकात काँग्रेसने बुलडोझर लावून शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडला. आता तेच काँग्रेसवाले आंदोलन करत आहेत. या काँग्रेसवाल्यांना खरेतर जोड्याने किंवा चपलेने मारलं पाहिजे. महाराष्ट्राची जनता समजदार आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनता जोड्याने मारणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले. आधी मुंबई उच्च न्यायालयात गेले, आता नागपूर खंडपीठात गेले. गरीब भगिनींना आम्ही पैसे देत आहोत तर यांच्या पोटात का दुखते, असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे.