Mahashivkavya : मुस्लीम मावळ्याने रचले 'महाशिवकाव्य'; अहमद शेख यांच्या प्रतिभेचा आविष्कार
'आकाश, पृथ्वी, आप, वायू, तेज, मनुज-मती, तुझे गुण गाती, काय कवने लिहिती, काय गाती महती, तिन्ही लोक वदती, राजा शिवछत्रपती' हे शब्द कोणा कसलेल्या कवीचे किंवा रचनाकाराचे नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित झालेल्या एका मुस्लीम मावळ्याचे आहेत. राकट-कणखर-दगडांच्या-फुलांच्या-शूरवीरांच्या या महाराष्ट्र देशाला आपल्या अजोड पराक्रमाने जागृत करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. या निमित्ताने शिवरायांना आदरांजली कशी अर्पित करता येईल या विचारात गढलेला असतानाच प्रतिभा जागी झाली आणि अवघ्या तीन महिन्यांत 'महाशिवकाव्य' प्रत्यक्षात आले. अहमद मोहम्मद शेख असे या शिवभक्त मुस्लीम तरुणाचे नाव आहे.
अहमद यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील येळंब. अहमद हे सध्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या 'स्कूल ऑफ मीडिया ॲक्टिव्हिटी रीसर्च अँड टेक्नॉलॉजी'मध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांची पत्नी आयशा या कॉग्निझंट कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतात. त्यांचे आई-वडील शेतकरी होते. अन्य मुस्लीम कुटुंबाप्रमाणेच त्यांचा दैनंदिन जीवन व्यवहार होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना २०१५ साली त्यांच्या भावाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या वडिलांचे २०१८ साली निधन झाले. एकामागे एक असे धक्के त्यांच्या कुटुंबाला बसत होते. अहमद यांनी मुंबईमधून मास्टर्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझमची पदवी घेतली. महाविद्यालयीन जीवनात ते 'अभाविप'च्या संपर्कात आणि पुढे कामात देखील सक्रिय झाले. काही माध्यम संस्थांमध्येही त्यांनी काही काळ काम केले. तेथून बाहेर पडल्यावर उदरनिर्वाहासाठी मंत्रालयात कंत्राटी पद्धतीने नोकरी केली. मात्र, कंत्राट संपल्यावर त्यांनी महर्षी स्त्री शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. अहमद यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी कष्टकरी वर्गाची. त्यांच्या जगण्यातला संघर्ष त्यांनी 'बत्ती' या कादंबरीच्या रूपाने मांडला. कोरोना काळातील टाळेबंदीदरम्यान आलेल्या या कादंबरीची आवृत्ती हातोहात संपली होती.
त्यांना लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आकर्षण निर्माण झाले होते. शिवरायांबद्दल असलेली अनेक पुस्तके त्यांनी वाचलेली होती. त्यामध्ये अनेक अभ्यासक आणि लेखकांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे केवळ ते हिंदू राजे होते या एकाच चष्म्यामधून न पाहता व्यापक अंगाने पाहायला हवे अशी त्यांची सुरुवातीपासूनची धारणा होती. शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनाचा सोहळा राज्यभर उत्साहात साजरा करण्यात आला. याच दरम्यानच्या काळात अहमद आणि त्यांचे मित्र यदुनाथ देशपांडे हे गप्पा मारत असताना, देशपांडे यांनी मुस्लीम समाजाचा शिवरायांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या मनामध्ये असलेला संभ्रम दूर होईल असे लिखाण करावे असे त्यांना सुचवले. हे अहमद यांना पटले. जावळीचा संग्राम असो की सुरतेची लूट असो. आग्रा भेटीचा थरार असो की घोडखिंडीचे शौर्य असो. अफजल खानाचा वध असो की शाहिस्ते खानाची छाटलेली बोटे असोत या शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना, प्रसंग, नातेसंबंध, मित्र-सहकारी अशा अनेक अंगांनी लिहावे असे त्यांनी ठरवले.
शिवाजी महाराज कृषिप्रधान राजे होते. त्यांनी सारा माफ करण्यासोबतच पाण्याची व्यवस्था निर्माण केली. जनतेला आपलेसे करून प्रेम आणि जिव्हाळा दिला. कोणताही भेदभाव केला नाही. शिवरायांप्रती असलेल्या समर्पित भावनेमधून त्यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरीस लिखाणाला सुरुवात केली. ही सुरुवात करण्याआधी पुन्हा पुस्तके चाळून आपल्या ज्ञानाला उजळणी दिली. पाहता पाहता हे महाशिवकाव्य साकारू लागले होते. त्यामध्ये गेयता येऊ लागली. गीत-संगीताच्या भाषेत बोलायचे झालेच तर सर्व काही 'मीटर' मध्ये बसत होते. कुठेही ओढून ताणून केलेला तो अट्टाहास नव्हता, तर आतून उमटलेली ती भावना शब्दरूपाने प्रकट होत होती. विशेषत: शिवमाता जिजाऊ यांच्याबाबतची कवनेही मनाचा ठाव घेऊन जातात.
महाराजांना धर्माच्या नजरेतुन पाहणे चूक
अहमद यांनी शिवकाव्य रचल्याचे समजताच अनेक मुस्लीम मित्र, परिचित यांनी आश्चर्य व्यक्त करायला सुरुवात केली. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. परंतु, त्यांनी आपले काम अव्याहत सुरू ठेवले. आता हे शिवकाव्य लिहून पूर्ण झाले आहे. आता ते प्रसिद्धीच्या प्रतीक्षेत आहे. शिवरायांना दोन्ही बाजूंनी केवळ धर्माच्या नजरेतून पाहणे बंद केल्याशिवाय खरे शिवराय समजणार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.
'सप्तसिंधू तप्त होती, बंदीवास त्या मिरविती, कलियुगात अवतरती, राजा शिवछत्रपती' अशा शब्दांत त्यांनी तत्कालीन भारताचे वर्णन केले आहे. मी मराठी मुसलमान आहे. शिवराय हेच आमची प्रेरणा आणि आदर्श असल्याचे ते म्हणतात. बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात झालेल्या आंदोलनातही त्यांनी हिरीरिने भाग घेतलेला होता. आजवरच्या वाटचालीत आई नन्हूबी शेख, पत्नी आयशा यांनी मोठी साथ दिल्याचे त्यांनी नमूद केले.