मतदानापर्यंत गोड बोलणाऱ्यांना धडा शिकवू; अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणेंवर संतापले मनोज जरांगे

अंतरवाली सराटी: राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा झाला आहे. अशात ओबीसी आरक्षणातून सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.  विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 12 Jul 2024
  • 12:18 pm
Manoj Jarange Patil, Amol Kolhe, Bajarang Sonavane, Maratha Reservation

संग्रहित छायाचित्र

'नीट' राहा अन्यथा विधानसभेला जागा दाखवू 

अंतरवाली सराटी: राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा झाला आहे. अशात ओबीसी आरक्षणातून सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.  विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. संसदेतही हा मुद्दा चर्चिला गेला. जातनिहाय जनगणना व्हावी आणि कुठल्याही समाजाचे आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली होती. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणे यांना इशारा दिला आहे.

मनोज जरांगे यांनी या प्रकरणी बजरंग सोनावणे आणि अमोल कोल्हे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. काही तृप्त आत्मे आपल्यात आहेत जे अभ्यासक आहेत, समन्वयक आहेत. या लोकांना समाजासाठी मी जे काम करतो आहे ते बघवत नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. संसदेत खासदार अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणेंनी जी भूमिका घेतली त्यावरून मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला आहे. मराठ्यांची मते घेईपर्यंत गोड बोलायचे,  मते घेतली की जात जागी होते यांची. आमच्या मराठ्यांना हेच कळले नाही. आता मात्र मराठ्यांचे डोळे उघडले आहेत असे म्हणत मनोज जरांगेंनी अमोल कोल्हेंना टोला लगावला आहे. तसेच एखाद्याला मराठ्यांनी खासदार केले, मग तो बदलला. पाच वर्षांसाठी त्याला वाटत असेल की आता मला काही धोका नाही. पण आमदारकीला त्यांच्या जिवावार कोणीतरी उभे करतीलच, त्याला मराठे पाडतील, असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे. मनोज जरांगेंनी नाव न घेता बजरंग सोनावणेंवरही टीका केली आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला आहे. मनोज जरांगेंनी जून महिन्यात बेमुदत उपोषणही सुरू केले होते. शंभूराज देसाईंनी त्यांची भेट घेतली. ज्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांचं बेमुदत उपोषण मागे घेतले.  त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारला १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ही मुदत देण्यात आली आहे. तसेच मागच्या शुक्रवारपासून त्यांनी शांतता मोर्चेही सुरू केले आहेत. आता मनोज जरांगेंनी अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणेंवर टीका केली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest