Santosh Deshmukh case
संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळं राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. हत्या करणाऱ्यांना शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी मोर्चा काढण्यात येत आहे. अशातच, मंत्री धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे यांनी इशार दिल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे जरांगेंवर कारवाईची मागणी केली आहे.
परभणीत काल म्हणजेच शनिवारी सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनोज जरांगे पाटीलदेखील सहभागी होते. यावेळी मनोज जरांगे यांनी घरात घुसून मारु असे म्हणजे धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा दिला. जरांगेंच्या या वक्तव्यामुळं नवा वादाला तोंड फुटले आहे.
जरांगेंच्या वक्तव्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या खास शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जरांगे घुसायची भाषा आम्हाला करु नका. तुमच्यात दम असेल तर कुठे घुसायचं सांगा असा उलट इशारा हाके यांनी जरांगेंना दिला. तसेच, अशी चितावणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा. अन्यथा दोन समजात अराजकता निर्माण होईल असंही हाके यावेळी म्हणाले.
यासोबत, हा काळ 200- 250 वर्षापुर्वीचा नाही, अशी चितावणीखोर वक्तव्य जरांगे करत असतील तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा. नाहीतर जातीय तेढ निर्माण होईल, सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल.
जरांगे दम असेल तर कधी, कुठे केव्हा? ते सांगा तुम्हाला जातीय तेढ निर्माण करुन काय मिळणार आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करत हाके म्हणाले तो काळा गेल्या महाराष्ट्रात काट्या कुऱ्हाड्यांचा, आताचा काळ हा कायद्याचा, संविधानाचा आणि इथल्या न्यायव्यवस्थेचा आहे, असंही पुढे ते म्हणालेत.
धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरवून द्यायला कोण आहेत ते जरांगे? जरांगे गुंड आहेत? जरांगे कुणी एस पी आहेत? कोण आहेत जरांगे? कायदा यांच्या मालकीचा आहे का? त्यामुळे असल्या चितावणीखोर बोलणं तुमच्या तिकडे कोणालातरी ऐकवा, अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांच्या बघितलेल्या आहेत, असंही लक्ष्मण हाके पुढे म्हणालेत.
जरांगे यांचे नेमकं वक्तव्य काय?
"धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देताय? त्याचा भाऊ गेला आणि तो न्यायासाठी लढतोय, वणवण फिरतोय. त्याला तुम्ही धमक्या देताय. संतोष भैयाचे भाऊ जेव्हा पोलिस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा. परळी असो की बीड, इथल्या समाजाला ही त्रास झाला तर घरात घुसून मारायचे. देशमुख कुटुंबीयांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. आम्ही फक्त कायद्याला मानतोय, म्हणून आम्ही शांत आहोत. सगळे आरोपी पकडले जातील, फासावर जातील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला."