संग्रहित छायाचित्र
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून पूर्ण राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून कोकण, मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाईने सोमवारी औदुंबरच्या मंदिरात शिरकाव केला. महाज तालुक्यात पावसाने दोघांचा मृत्यू झाला आहे.
कोयना-कृष्णा नदीक्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने कृष्णेची पाणीपातळी रात्रीत ९ फूट ८ इंचांनी वाढली. त्यामुळे भीलवडीजवळच्या औदुंबर दत्त मंदिर परिसरात पाणी शिरले. चांदोली धरणाच्या सांडव्यापर्यंत पाणी आल्याने कोणत्याही वेळी विसर्ग करण्यात येणार असल्याने वारणा काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
औदुंबरनजीक भिलवडी पुलाजवळ रविवारी सायंकाळी १९ फूट २ इंच असणारी पाणीपातळी सोमवारी सकाळी २८ फूट १० इंच झाली. नागठाणे बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला असून औदुंबरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णामाईने प्रवेश केला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात कोयना येथे १७६, महाबळेश्वरमध्ये २४५ आणि नवजामध्ये २३६ मिलिमीटर पाऊस झाला. धरणात ६०.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
वारणेवरील चांदोली धरणाजवळ ७८ मिलिमीटर पाऊस नोंदला असून सांडव्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज वक्राकार दरवाज्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे. महाडमध्ये कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाची संततधार आजही कायम होती. त्यातच महाबळेश्वर येथे कोसळणाऱ्या धुवाॅंधार पावसाने नद्या, ओढे ओसंडून वाहात होते. महाड तालुक्यात मुसळधार पावसाने दोघांना जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड, पोलादपूर आणि कर्जत तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभर जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे सावित्री, कुंडलिका नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे महाड, पोलादपूर परिसराला पूरसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. ही बाब लक्षात घेऊन तीन तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित १३ तालुक्यात शाळा नियमित सुरू राहणार आहेत.