स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात भाजली राजकीय पोळी
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी पुण्यातील उमेदवारांचा मेळावा आयोजित करुयात. असे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सांगून त्यांची मदत घेवून कार्यक्रमाचे आयोजनासाठी मदत घेतली. अराजकीय कार्यक्रमाला राजकीय रंग देवून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात राजकीय पोळी भाजून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लॉंच करण्यात आले असा आरोप काही नाराज विद्यार्थ्यांनी मिररशी बोलताना केला.(Sharad Pawar)
''अस्वस्थ तरुणाई.. आश्वासक साहेब..! पवारसाहेबांचा तरुणाईशी थेट संवाद'' या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी बालगंधर्व येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून तुम्ही, आम्ही, तरुणाई असा उल्लेख केला होता. त्यामुळे हा कार्यक्रम अराजकीयच असे सांगण्यात आले होते. मात्र ऐनवेळी मंचावर लावण्यात आलेल्या फलकावर आयोजक म्हणून अखिल भारतीय शिवमोहत्सव समितीचे नाव लिहिण्यात आले होते. तसेच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजकीय भाषण केले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.(MPSC Student)
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील तसेच माजी सनदी अधिकाऱ्यांना कार्यक्रमात बोलविण्याचे ठरविण्यात आले होते. त्यात शरद पवार राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सामाजिक चळवळीशी संबंधित आहेत. त्यामुळे ते राजकीय काही बोलणार नाहीत. असे आयोजनातील विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पवार यांनी एकही शब्द राजकीय बोलला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल दिलेला शब्द तंतोतंत खरा ठरला. परंतु काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच राजकारणात प्रवेश करु इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना भाषणाची संधी देण्यात आली. तसेच राजकीय बोलू नये सांगितलेले असताना देखील पक्षाचे नाव घेवून एकप्रकारे प्रचारच केला. त्यामुळे या कार्यक्रमाला राजकीय वळण लागले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पवारांना फक्त स्पर्धा परीक्षेशी संबंधितच प्रश्न विचारण्याची संधी देण्याचे ठरले होते. परंतु ठरलेले विषय सोडून इतर विषयांवरील प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे सभागृहात विद्यार्थ्यांनी आपेक्ष घेत केवळ स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचेचे प्रश्न विचारावेत अशी सूचना केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले.
कार्यक्रमावेळी कॉंग्रेसचे उमेदवार यांना निवडूण आणण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. त्यामुळे हा कार्यक्रम नेमका त्यांच्यासाठी होता की विद्यार्थ्यांसाठी असा संताप जनक सवाल विद्यार्थ्यांनी मिररशी बोलताना उपस्थित केला. तसेच पुण्यातील कसबा विधान सभेच्या निवडणुकी दरम्यान स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे राज्य सेवेचा नवीन अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी उपोषण सुरु होते. ऐन निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळीची संधी साधत शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमावेळी शरद पवारांनी पुन्हा संधी साधत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतले. इतर वेळी ते कधीही या प्रश्नांवर बोलल्याचे पाहिले नाही. असा आरोप काही विद्यार्थ्यांनी मिररशी बोलताना केला.
राज्यातील तरुणाईची अस्वस्था समजून घेणारा आश्वासक म्हणून शरद पवार यांच्याकडे तरुणाई पाहते. कार्यक्रम हा राजकीयच होता. नियोजनाप्रमाणे कार्यक्रम सुरु होता. एक हजार तरुण सभागृहात होते. तर तेवढेच बाहेर होते. आलेल्या राजकीय व्यक्तींना समोर बसण्यासाठी खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. परंतु मुलांची संख्या वाढल्याने आम्ही हातबल ठरलो. राजकीय व्यक्तीच्या सन्मानासाठी त्यांना स्टेजवर बसविले. पुण्यातील लोकसभेच्या उमेदवाराचे नाव आम्ही घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांनीच अधिक घेतले. त्यांच्या आग्रहाखारत त्यांनी भाषण न करता केवळे एकच घोषणा दिली. ठरलेल्या प्रमुखांनी भाषण केले. ते काय बोलले त्यात आमचे काही नव्हते. तसेच स्टेजवर राजकीय भाषण करायचे नाही, असे ठरलेलेच होते. काही जण बोलले असतील. पण कार्यक्रमाचा उद्देश साफ होता. आयोजक किंवा निमंत्रक म्हणून आमच्या संस्थेचे नाव लिहिले त्यामुळे फारसा फरक पडत नाही. आपण सर्वजण एकच आहोत.
- विकास पासलकर, संस्थापक अध्यक्ष - अखिल भारतीय शिव महोत्सव समिती.