संग्रहित छायाचित्र
एखाद्या व्यक्तीला बोगस आयएएस करण्याइतकी मी मोठी नाही, असे प्रतिपादन करत प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्याशी जोडला जाणारा संबंध भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फेटाळून लावला आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध वादांमुळे प्रकाशात आलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी खेडकर यांच्या कुटुंबाशी पंकजा मुंडेंचा संबंध जोडला जात आहे. यावर संतप्त झालेल्या पंकजा मुंडे म्हणाल्या, मी प्रीतम मुंडेंचं तिकीट वाचवू शकले नाही. मी स्वत: निवडून येताना माझी दमछाक झाली. असे असताना मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यापेक्षा मोठी आहे का की एखाद्या व्यक्तीला मी बोगस आयएएस करू शकते? यात काही तर्क आहे का? हे करण्याची शक्ती माझ्याकडे गेल्या पाच वर्षांत नव्हती. ती असती तरी मी असं काही करणार नाही. मी यावर कायदेशीर पाऊल उचलणार नाही. मात्र, येथून पुढे अशा गोष्टी सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर पिस्तूल हातात घेऊन गावकऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आहेत. त्यात पंकजा मुंडेंनी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याकडून पैशांचा चेक स्वीकारल्याचा दावा केला जात आहे. पंकजा मुंडेंनी ट्रस्टसाठी हा चेक स्वीकारल्याचाही आरोप केला जात असताना त्यावर पंकजा मुंडेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. त्या म्हणाल्या, मीच कधीकधी माझ्याकडून जमतील तसे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला पैसे देत असते. अशा आरोपांमुळे मी अत्यंत्य व्यथित झाले आहे. मी निवडणुकीतील विजयाचा आनंद जनतेसोबत साजरा करत होते. हा आनंद काही लोकांना पाहवला नाही. पूजा खेडकर यांच्या बातम्या अनेक दिवसांपासून चालू आहेत, पण कालच काही लोकांना काय साक्षात्कार झाला की त्यांनी ठरवलं की हे पंकजा मुंडेंशी जोडायचंय.
कुणीतरी किरकोळ माणूस काहीतरी बोलतो. मागेही असंच झालं होतं. माझ्याविषयी बातमी झाली होती. तेव्हाही मी मानहानीचा दावा केला होता. कोणतीही खात्री न करता काही माध्यमांनी ही बातमी चालवली. आता हे मी सहन करू शकत नाही. मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानसाठी खेडकर यांच्याकडून एक रुपयाचा निधी घेतलेला नाही. माझा या सगळ्याशी काय संबंध आहे?.
मी काय पाच वर्ष मंत्री आहे का? माझ्या कारखान्यांवर जप्तीच्या कारवाया होतात. मी माझ्याच अडचणींमध्ये आहे. मी या गोष्टी कोणत्या अधिकारांत करू शकते? आणि मी का करू हे? असा सवालही मुंडे यांनी केला. त्या म्हणाल्या, पूजा खेडकर चुकल्या असतील तर शिक्षा होईल. नसतील चुकल्या तर खरं-खोटं होईल. आता या राज्यात किती लोक, मंत्री, अधिकारी आहेत, जे खासगी गाड्या वापरतात आणि त्यावर लाल दिवा लावतात? माझं तर म्हणणं आहे की यावरही एक जनहित याचिका टाकली पाहिजे. आयएएससारखी महत्त्वाची परीक्षा कुणी चुकीच्या पद्धतीने उत्तीर्ण करत असेल, तर त्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. हा स्थानिक विषय आहे की राष्ट्रीय विषय आहे?, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.