संग्रहित छायाचित्र
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूर आला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी अडकले आहेत. नदी, नाले तुडूंब वाहत आहेत. परभणी जिल्ह्यात बस वाहून गेली असून चालक-वाहक सुखरूप बचावले आहेत.
मुसळधार पावसाने मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांना झोडपले आहे. नांदेडमध्ये पाण्याचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदेड शहराशी वसमत आणि इतर ५०-६० गावांचा संपर्क तुटला आहे. आताही जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी तासाभराच्या विश्रांतीनंतर नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढला. शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले. पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होण्याचा धोका आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. मनार नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मनार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील हदगावमधील उंचडा गावाला कयाधू नदीच्या पाण्याने वेढा घातला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. शेतकऱ्यांची अनेक जनावरे वाहून गेली आहेत. ३० शेतकरी शेतामध्ये, घरावर अडकून पडले आहेत.
हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील देवजना गावात ४० शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. रात्रीपासून देवजना गाव पाण्याखाली आहे. धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेर धरणातून १५ हजार ८०० क्युसेक्सने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील केळणा नदीला पूर आला आहे, तर दहेगाव बंगला गावात पाणी घुसलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदीकाठच्या परिसरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. वाशी, कळंब आणि धाराशिव या तीन तालुक्यांत पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. कळंब तालुक्यातील इटकूर मंडळात सर्वाधिक १५० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. धाराशिव ग्रामीणमध्ये ९० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाची झड सुरू असल्यामुळे पोळ्याच्या दिवशी अनेकांची तारांबळ उडाली. तेरणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शनिवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस सोमवारीही कमी-अधिक प्रमाणात सुरूच होता. जिल्ह्यातील आठपैकी तीन तालुक्यांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वाधिक ९० मिलीमीटर, वाशी तालुक्यात ७२ आणि धाराशिव तालुक्यात ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. भूम तालुक्यात मागील २४ तासात ४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कळंब शहर परिसरात १०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने तेरणा परिसरातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. मागील आठवड्यात धाराशिव शहराला पाणीपुरवठा करणारे तेरणा धरण ओसंडून वाहू लागले होते. त्यात मागील दोन दिवसांच्या पावसामुळे तेरणा धरणातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या वेगात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तेर गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. धरण परिसरातील गावांत नदी-नाल्यांना पूर आला आहे. अतिवृष्टी व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे शेतात पाणी साठून खरीप पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
पुरात बस वाहून गेली
पुराच्या पाण्यात बस वाहात गेल्याची घटना मानवत तालुक्यातील वझुर (बु.) येथे पहाटे चारच्या सुमारास घडली. ही बस मुक्कामी होती. चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख हे दोघे बसमध्ये झोपलेले होते. पहाटे पाणी शिरल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला. बस चालू होण्यास वेळ लागला. तोपर्यंत पाण्याचा एक मोठा लोंढा आला आणि बस सोडून वाहू लागली. प्रसंगावधान राखून चालक व वाहकाने बसमधून उड्या मारल्या व जीव वाचवला. बस १०० मीटर पेक्षा अधिक दूर पाण्यात वाहून गेली. पुढे एका खांबाजवळ जावून बस अडकली.