संग्रहित छायाचित्र
पुढील ७२ तासांत राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार (Shinde-Fadnavis-Pawar) कोसळणार असल्याचा दावा पुन्हा एकदा ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी (दि. १३) केला. त्याचबरोबर, ‘‘मी याआधीही हे सरकार (Maharashtra Politics) ७२ तासांत जाणार असल्याचे बोललो होतो, मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यावेळी घेतलेली भूमिका पाहता खरंच ती वेळ आलेली आहे, असेही राऊत यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांना नवीन वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळकाढूपणा केल्याचा ठपकाही सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांवर ठेवला आहे. त्यावर संजय राऊत यांनी राज्यातील सरकार पडणार असल्याचे नवे भविष्य वर्तवले.
राऊत सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘‘विधानसभा अध्यक्षांनी वेळकाढूपणाचा आयसीयू समोर करून सरकार वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता त्यांनाच आयसीयूमध्ये जाण्याची वेळ आली आहे. ‘सौ सोनार की एक लोहार की,’ अशा पद्धतीचे मत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले आहे. यावेळी न्यायालयाने हातोडा मारला आहे.’’ नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे पुरावे नष्ट करत आहेत. त्यामुळे दादा भुसे यांच्याबरोबरच राज्याचे गृहमंत्रिपद सांभाळत असलेले देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा घ्यावा, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीदेखील राऊत यांनी या निमित्ताने केली आहे.
मविआच्या सत्ताकाळातच ठाकरे भाजपसोबत जाणार होते : सुनील तटकरे
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना म्हणजेच महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत जाऊन सरकार बनविण्याची तयारी केली होती, असा नवा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. ही माहिती आम्हाला ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीच दिली होती, असेही तटकरे म्हणाले.उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी सातत्याने वाईट लिहून येत आहे. त्यावरून तटकरे यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे. यातच त्यांनी ठाकरे यांच्या भाजपसोबत जाण्याच्या तयारीचा उल्लेख करत हा दावा केला आहे. ‘‘मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्यातील काही विषयांवर चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यास गेले होते. या भेटीनंतर ठाकरे यांच्या मनात भाजपसोबत सरकार बनविण्याचा विचार सुरू झाला होता. संजय राऊत यांनीच अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबत आम्हाला माहिती दिली होती,’’ असा दावा तटकरे यांनी केला आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, तसेच मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले.