संग्रहित छायाचित्र
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. मात्र एका लाडक्या बहिणीने तब्बल २८ अर्ज दाखल केल्याचे उघड झाले आहे. (Fraud in the Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेत लाडक्या बहिणीने केलेला घोटाळा आता समोर आला आहे. पनवेलच्या एका महिलेने भरलेला अर्ज नाकारला गेला. पण, त्यामुळे सातारच्या महिलेचा घोटाळा उघडकीस आला आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे उकळायला एका जोडप्याने लढवलेली शक्कल अखेर फेल ठरली आहे.
एका लाडक्या बहिणीचा आणि भावोजीने केलेला घोटाळा समोर आला. पूजा महामुनी नावाची खारघर येथील २७ वर्षीय महिला आपला अर्ज भरायला गेली. पण, त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही. तो वारंवार नाकारला जात होता. पूजा यांनी या संदर्भात सखोल चौकशी केली. त्यावेळी त्यांना कळाले की, त्यांच्या आधार क्रमांकावरून यापूर्वीच अर्ज भरून झाला आहे. त्याचे दोन महिन्यांचे पैसेही बँकेच्या खात्यात जमा झाले आहेत. ही माहिती पाहून पूजा महामुनी यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या पहिल्यांदाच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत होत्या. पूजा यांनी तत्काळ ही बाब पनवेलचे माजी नगरसेवक नीलेश बावीस्कर यांना सांगितली. त्यांनी ज्यावेळी चौकशी केली. त्यावेळी लाडक्या बहिणीचा लालची घोटाळा समोर आला. या घोटाळ्यात साताऱ्यातील खटाव येथील २२ वर्षीय प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेचे नाव समोर आले. तत्काळ साताऱ्यातील महिला व बालविकास खाते अॅक्टिव्ह झाले. एक समितीही नेमण्यात आली. या समितीने सखोल चौकशी केल्यावर २२ वर्षांच्या लाडक्या बहिणीने तब्बल २८ बनावट अर्ज वेगवेगळ्या आधार क्रमांकावरून एकच अकाऊंट नंबर देऊन दाखल केल्याचे समोर आले. सध्या अर्जांची तपासणी सुरू आहे. बनावट अर्जांच्या आकड्यात वाढ होऊ शकते. वृत्तसंंस्था