साताऱ्यातील शेतकऱ्यांनी दरनिश्चिती करून दाखवली!

गेले काही दिवस सतत पडत असलेला पाऊस आणि वेगवेगळ्या रोगराईमुळे बाजारात टोमॅटोची आवक कमालीची घटली आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर शंभरीपार झाले आहेत. याचा फायदा सध्या शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी आणि विक्रेत्यांनाच अधिक होत असून त्याला उत्तर देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव परिसरातील टोमॅटो उत्पादक एकत्र आले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 1 Aug 2024
  • 11:05 am
Farmers in Satara showed price fixing!, tomatoes, Satara district have come together.

संग्रहित छायाचित्र

एकीमुळे दर ठरवून टोमॅटो पाठवत असल्याने होत आहे साऱ्यांना फायदा

सातारा: गेले काही दिवस सतत पडत असलेला पाऊस आणि वेगवेगळ्या रोगराईमुळे बाजारात टोमॅटोची आवक कमालीची घटली आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर शंभरीपार झाले आहेत. याचा फायदा सध्या शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी आणि विक्रेत्यांनाच अधिक होत असून त्याला उत्तर देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव परिसरातील टोमॅटो उत्पादक एकत्र आले आहेत. त्यांनी ‘टोमॅटो आमचा, दरही आमचाच’ असा निर्धार करत टोमॅटो विक्री सुरू केली आहे. सध्या येथील शेतकरी एकत्रितपणे मुंबई, पुण्याच्या बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांशी बोलून आपला दर ठरवतात आणि त्यानुसारच व्यवहार करतात. शेतकऱ्यांच्या या उपक्रमाची सध्या साताऱ्यात सर्वत्र चर्चा आहे.

कोरेगाव तालुक्यातील तडवळे संमत कोरेगाव, कुमठे, खेड नांदगिरी, जळगाव, भोसे, सांगवी, सुलतानवाडी, सातारा रोड ही गावे बागायती म्हणून ओळखली जातात. येथून प्रगतशील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस, आले या नगदी पिकांसह टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी आदी भाजीपाला घेतात. या गावांमधून रोज भाजीपाल्याचे अनेक ट्रक मुंबई, वाशी, पुण्यासह इतर बाजारात जातात. यात टोमॅटो पिकाचा वाटा लक्षणीय आहे. ही गावे रोज शेतीमाल शहराच्या बाजारात पाठवतात. मात्र, त्याला भाव मात्र अनेकदा कवडीमोल दराने मिळतो. गेल्या काही दिवसांपासून शहरातील टोमॅटोचे दर कमालीचे वधारलेले असताना हाच अनुभव पुन्हा या शेतकऱ्यांना आल्याने त्यांनी एकत्र येत वरील निर्णय घेतला. गेल्या महिनाभरापासून शहरात टोमॅटोचे दर किलोला शंभर रुपयांच्या घरात टिकून आहेत. शेतकऱ्यांना मात्र किलोला ३० ते ४० रुपये दर मिळत होता. ही भली मोठी तफावत विचारात घेता शेतकऱ्यांनि विचार करून हा उपक्रम सुरू केला. 

या भागातील शेतकरी एकत्र आले आहेत. ते रोज पुण्या-मुंबईतील बाजारातील घाऊक व्यापाऱ्यांशी बोलून दराचा अंदाज घेतात आणि मग दर ठरवतात. या दराच्या खाली कुणीही टोमॅटोची विक्री करायची नाही हा नियम सारेजण पाळतात. आता एकीनंतर शेतकऱ्यांना ६० रुपये किलो दर मिळत आहेत. केवळ शेतकरी एकत्र येण्यामुळे हा बदल घडला आहे.

Share this story

Latest