संग्रहित छायाचित्र
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन सरकारी नोकरी मिळविल्याचे समोर आल्यानंतर देशात खळबळ उडाली आहे. आता अशीच प्रकरणे राज्यातही समोर येऊ लागली आहेत. एमपीएससीच्या परीक्षेत खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करुन नोकरी मिळविल्याचा आरोप केला जात आहे.
याची दखल घेत एका विद्यार्थी संघटनेने राज्यात सर्व्हे करुन तब्बल २५० जणांची यादी तयार केली आहे. ही यादी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्र लोकसेवा आयोगालादेखील सादर केली जाणार आहे. त्यामुळे आता राज्यातील पूजा खेडकर यांच्याप्रमाणे किती उमेदवार समोर येणार, याकडे लक्ष लागून आहे.
पूजा खेडकर यांनी यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी केलेले कारनामे समोर आले. त्यामुळे देशात सर्वात विश्वासू असलेल्या यूपीएससी परीक्षेत असा गोंधळ कसा काय होऊ शकतो, असा गंभीर प्रश्न देशातील उमेदवारांना पडला आहे. त्यासोबतच राज्यातदेखील अनेक उमेदवारांनी एमपीएससीची परीक्षा देताना खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करुन सरकारी नोकरी मिळविल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यासंदर्भातील प्रकरणे आता बाहेर येऊ लागली आहेत.
दिव्यांग घटकासाठी शासनाने आरक्षण निश्चित केले आहे. त्या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी अनेक उमेदवारांकडून खोटी प्रमाणपत्रे काढली जातात. या आरक्षणातून इतरांपेक्षा खूप कमी गुण मिळवून सरकारी नोकरी मिळते. त्याचाचा फायदा उमेदवारांकडून घेतला जात असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे. काही जण निकषानुसार दिव्यांग नसताना त्यांच्याकडून त्या आरक्षण कोट्यातून अर्ज केले गेले आहेत. राज्यात २५० विद्यार्थ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा दावा करण्यात येत आहे.
संशयितांच्या कुंडल्या एमपीएससी, मुख्यमंत्र्यांना देणार
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या स्टुडन्ट्स राईट असोसिएशन या संघटनने खोटी प्रमाणपत्रे सादर केलेल्यांची माहिती आणि त्यांचा लेखाजन्खा गोळा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार राज्यात गुगल फॉर्मच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात आली आहे. त्याला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला असून तब्बल २५० हून अधिक जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांची कुंडल्यादेखील तयार करण्यात आली आहे. या कुंडल्या एमपीएससीसह, दिव्यांग सचिवालय, मुख्य सचिव, दिव्यांग सचिवालयाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता राज्यात मोठी खळबळ उडणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांनी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रावरुन देशभरात वादळ निर्माण झाले आहे. पण संघ लोकसेवा आयोगातील या प्रकारानंतर देशभरात काही अधिकाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्रे दिल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यावरुन अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहे. स्टुडन्ट्स राईट असोसिएशन या संघटनेने तयार केलेली यादी आता सरकारीदरबारी सादर झाल्यानंतर अनेकांचे कारनामे समोर येणार आहेत.
पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातदेखील अशी प्रकरणे घडल्याचा दावा काही विद्यार्थ्यांकडून केला जात होता. त्याची दखल घेत संघटनेच्या माध्यमातून राज्यात सर्व्हे केला. त्यातून तब्बल २५० हून अधिक जणांची यादी समोर आली आहे. यामध्ये काही जणांनी बनावट प्रमाणपत्रे घेतल्याचे समोर आले आहे. आता ही यादी दिव्यांग सचिवालयाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे. तसेच एमपीएससीने या प्रकरणाची फेर पडताळणी करावी, अशी आमची मागणी आहे.
- महेश बडे, स्टुडन्ट्स राईट असोसिएशन