संग्रहित छायाचित्र
मुंबई: मालवणातील राजकोट किल्ल्यावरील कोसळलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि सुरत लुटीवरूनचा वादाचा गदारोळ संपत नसताना एका मुलाखतीत राजमाता जिजाऊ यांची तुलना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेशी केल्याने पुन्हा नवा वाद तयार होऊ पाहात आहे. याबाबत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला देत फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून सादर केल्यानंतर महाराज तिच्याकडे पाहून म्हणाले, ‘अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो. कल्याणचा सुभेदार स्वराज्याचा शत्रू होता. तरीही त्याच्या सुनेला परत पाठवणारा आमचा राजा होता.
फडणवीस यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाचा व्हीडीओ शेअर करत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाषणात बाळासाहेबांनी ‘अशीच अमुची आई असती…’ ही कविता लिहिणाऱ्या कवीवर व त्या कवितेचा दाखला देणाऱ्यांवर संताप व्यक्त केला होता. बाळासाहेब म्हणाले होते, आपल्याला बऱ्याचदा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं उदाहरण दिलं जातं. सुभेदाराची सून महाराजांसमोर नजराणा म्हणून सादर केली तेव्हा तिच्याकडे पाहून महाराज म्हणाले, ‘अशीच आमची आई सुंदर असती, आम्ही देखील झालो असतो इतकेच सुंदर’. ही कविता लिहिणाऱ्या कवीच्या कानफाटात वाजवायला पाहिजे. अरे गधड्यांनो छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईबद्दल म्हणजेच राजमाता जिजाऊंबद्दल नितांत आदर होता. आपले राजे त्या सुभेदाराच्या सुनेसाठी स्वतःच्या मातेचा अपमान करतील का? महाराजांनी असं कधीही केलं नसतं. ते उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाहीत.
छत्रपतींना आईंबद्दल नितांत आदर होता. ते महाराज राजमाता जिजाऊसाहेबांची तुलना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेशी का करतील? अहो फडणवीस, तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल फक्त खोटा इतिहास पेरणाऱ्या परंपरेचे वारसा चालवता. मराठी जनतेसमोर तुम्हा लोकांचा कपटी शिवद्रोही चेहरा समोर आणू, तुमचे डावपेच आता चालणार नाहीत.
या राजकारणावर फडणवीसांनी उत्तर दिले असून ते म्हणतात, बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची गरज आहे. मी त्यांची नावं घेणार नाही. सर्वांना सद्बुद्धी मिळो, अशी बाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या खंडणीच्या विधानावर ते म्हणाले, ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलं गेलं, त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल. खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक असणारे सदानंद मोरे, शिवरत्न शेट्ये अशा सगळ्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. माझं एकच म्हणणं आहे की माझा राजा लुटारू नव्हता. माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही. शिवरायांनी सामान्यांना कधीही त्रास दिलेला नाही. इतिहासात काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील, तर त्या सुधारल्या पाहिजेत. शेवटी हे सगळं लिहिणारा इंग्रजांचा इतिहासकार आहे. इंग्रजी इतिहासकाराच्या नजरेतून शिवाजी महाराजांना पाहण्याऐवजी आपल्या सगळ्या इतिहासकारांनी सोबत यावं आणि जिथे कुठे महाराजांबद्दल चुकीचं असेल, ते सुधारण्याचा प्रयत्न करावा.