वाढते अपघात, बेशिस्त वाहतूक आणि वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक वाहतूक व्यवस्थापनाअंतर्गत एआय प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या अंतर्गत द्रुतगती मार्गावर बसवलेल्या कॅमेऱ्यांद्वारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ हजार दोषी वाहनचालकांना दंडाच्या रकमेचे चलन पाठवण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्याबाबत नुकताच आढावा घेण्यात आलेला आहे. गेल्या १७ जुलैपासून ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडत असल्याचे निदर्शनास आल्याने राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम' कार्यान्वित केली आहे. या प्रणालीचे पुण्यामधील कुसगाव येथे कमांडिंग कंट्रोल सेंटर उभारले आहे. वाहतुकीच्या नियमांचा भंग केलेल्या वाहनधारक 'एआय' कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यांना दंडाची पावती ऑनलाईन पाठवण्यात आली. दरम्यान, महामार्गावर सातत्याने घडणारे अपघात, वेगाची मर्यादा आणि लेन कटिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी तसेच, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर एआय कॅमेऱ्यांचा समावेश असलेल्या इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सीस्टिमद्वारे नियंत्रण आणण्यात येत आहे.
असे चालते काम
द्रुतगतीवर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांचे फोटो काढण्यात येतात. संबंधित कंपनीचे कर्मचारी त्या फोटोची खातरजमा करतात. दिवसाकाठी जवळपास दहा ते पंधरा हजार फोटो निघतात. त्यातून फोटोच्या माध्यमातून वाहनचालकाकडून नियमभंग झाला आहे, असे निदर्शनास आल्यास संबंधित माहिती आरटीओ विभागाला पाठवली जाते. पुणे, पिंपरी-चिंचवड, पेन, पनवेल, कल्याण येथील १६ साहाय्यक परिवहन अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे ही माहिती पाठवली जाते. त्यानंतर पुन्हा त्या फोटोची तपासणी होते. नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट दिसून आल्यास संबंधित वाहनावरती चलन जनरेट होते. अनेकदा रात्रीच्या वेळी फोटो काढल्यानंतर तो व्यवस्थित दिसत नाही. त्यानुसार त्याची पुन्हा मूळ फोटोची कॉपी पाहिली जाते.
ही आहेत चलनाची कारणे
अतिवेगात वाहन चालवणे, सीटबेल्टचा वापर न करणे, लेन कटिंग करणे, नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन थांबविणे, विरुध्द दिशेने वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने मार्गावर येणे किंवा बाहेर पडणे, दुचाकीचा अवैध प्रवेश, वाहनांना रिव्हर्स गिअरने मागे घेणे, बेकायदेशीर नंबर प्लेट लावणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे त्याचप्रमाणे द्रुतगतीवरील नियमाचे उल्लंघन करणे इत्यादी