Employment : राज्यातील पाच हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार : उद्योगमंत्री

उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून आज सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे ५ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील

Employment

राज्यातील पाच हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार : उद्योगमंत्री

पुणे: उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून आज  सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे ५ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. (Uday Samant) 

वाकड येथील हॉटेल टिपटॉप येथे आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील २४ तज्ज्ञ संस्थासोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सह संचालक शैलेश रजपूत आदी उपस्थित होते. 

सामंत म्हणाले, पुण्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगाने होत आहे. विविध प्रकारच्या उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा येथे असून नवीन उद्योगांसाठी चांगली संधी आहे.  पुण्याची क्षमता राज्यासह देशाला कळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढे अशाप्रकारचा 'उद्योजकांचा मेळा' प्रत्येक जिल्ह्यात भरविण्यात येईल, यामुळे त्या जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण तयार होईल, विविध उद्योजक आकर्षित होऊन तेथील उद्योगामध्ये वाढ होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. 

अल्ट्रामेगा प्रकल्पासोबत सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाला चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे.  उद्योजक उद्योग करीत असताना त्यांसाठी निर्यात ही महत्वाची असून हीच बाब विचारात घेऊन 'निर्यात धोरण २०२३' जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या माध्यमातून उद्योजकांना अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर निर्माण होत असून आगामी काळात जगातील डेटा सेंटरचे हब म्हणून महाराष्ट्र राज्य ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

आगामी काळात देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता पार्क निर्माण करण्याबाबत विचार करण्यात येईल. राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता पार्क निर्माण करतांना संरक्षण, आरोग्य, क्रीडा, कृषी आदी क्षेत्राचा विचार करण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत इलेक्ट्रिकल वाहन, हायड्रोजन या क्षेत्राच्या विकासाबाबतही प्रयत्न करण्यात येत आहे, असेही सामंत म्हणाले. 

उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, यासाठी उद्योजकांशी सतत चर्चा करण्यात येत आहे. शासनाच्यावतीने त्यांना उद्योगपुरक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात परकीय गुंतवणूक वाढत असून उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात १ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरु असून येत्या काळात गडचिरोली उद्योगनगरी म्हणून ओळखली जाईल, असेही उद्योगमंत्री म्हणले. 

पुरस्कारार्थीचे अभिनंदन करून ते म्हणाले, पुरस्काराला अन्ययसाधारण महत्व असून पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्था यांचा आदर्श घेऊन राज्यातील इतरांनी उद्योग उभारले पाहिजे, त्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे, हा पुरस्कार देण्यामागचा हेतू असतो. महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे स्वरुप अधिक व्यापक करण्यासाठी उद्योजकांची समिती गठीत करण्याची सूचना केली. पुरस्काराचे प्रस्ताव समितीकडे देण्यात यावे, प्रस्तावाच्या अनुषंगाने समितीच्या प्राप्त सूचना विचारात घेऊन आगामी काळात पुरस्काराचे वितरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले

कांबळे म्हणाले, राज्यात परकीय गुंतवणूकीमध्ये वाढ झाली पाहिजे, उद्योगामध्ये वाढ झाली पाहिजे, याकरीता उद्योग विभागाच्यावतीने काम करण्यात येत आहे. उद्योग सुरु करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यासाठी ‘मैत्री’ संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून आवश्यक त्या सर्व परवानग्या विहित मुदतीत देण्यात येत आहे. राज्यात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने सूचना असल्यास उद्योग विभागाला कळवावे, असे आवाहन कांबळे यांनी केले.

कुशवाह यांनी प्रास्ताविक केले. राज्यात माहिती तंत्रज्ञान धोरण आणि निर्यात धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा निहाय निर्यात समिती गठीत करुन जिल्हा निर्यात आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील उत्पादन निर्यात करण्यावर भर देण्यात येत आहे. दहा कलमी कार्यक्रम आखून जिल्हानिहाय निर्यातक्षम उपक्रम निश्चित करण्यात आले आहे, असेही कुशवाह म्हणाले.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest