Electricity: पश्चिम महाराष्ट्रातील वीजग्राहक होणार स्मार्ट

पुणे: नव्या तंत्रज्ञानाचे तसेच आर्थिक गरजेनुसार वीजवापराच्या नियोजनाचा अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड वीजमीटर लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे मोफत बसविण्याचे नियोजन महावितरणकडून पूर्णत्वास गेले आहे.

Smart Prepaid Electricity Meters

संग्रहित छायाचित्र

महावितरण ६८.४० लाख स्मार्ट प्रीपेड मीटर मोफत बसवून देणार, वीजजोडण्यांसोबतच सव्वा लाखांवर रोहित्रे

पुणे: नव्या तंत्रज्ञानाचे तसेच आर्थिक गरजेनुसार वीजवापराच्या नियोजनाचा अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड वीजमीटर लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे मोफत बसविण्याचे नियोजन महावितरणकडून पूर्णत्वास गेले आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सिंगल व थ्रीफेजच्या एकूण ६८ लाख ३९ हजार ७५२ वीजग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत. (Latest News Pune)

यासोबतच महावितरणच्या वितरण यंत्रणेतील विजेचा हिशेब आणखी अचूक ठेवण्यासाठी १ लाख २८ हजार ६२३ वितरण रोहित्रे, वीजवाहिन्यांना स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. येत्या मार्चपासून हे मीटर टप्प्याटप्प्याने पश्चिम महाराष्ट्रात बसविण्याचे काम सुरू होईल.

वीजेची तसेच नवीन वीजजोडण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी तसेच वितरण यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतून लघुदाब वीजग्राहकांकडे प्रीपेड स्मार्ट मीटरदेखील लावण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना जागतिक दर्जाची ग्राहकाभिमुख सेवा देण्याची सूचना महावितरणला केली आहे. त्यानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचे व विजेच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा ग्राहकांना अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येत आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या पारंपरिक वीजमीटरच्या प्रणालीमध्ये ६८ लाख ४० हजार ग्राहकांकडे जाऊन दरमहा मीटरचे फोटो रिडिंग घेणे, त्यानुसार वीजबिल तयार करणे व बिलांचे वितरण करणे या प्रक्रियेत काही दिवसांचा कालावधी लागतो. तसेच घराला कुलूप असल्याने रीडिंग न घेता येणे, चुकीचे असल्यास दुरुस्ती करणे, मीटर नादुरुस्त होणे तसेच वीजबिलांचा भरणा न होणे, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे अशी कारणे उद्भवतात. त्यामुळे स्मार्ट मीटरिंगची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ‘‘वीजग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर अत्यंत उपयुक्त असून त्यामुळे वीजेवरील खर्च नियंत्रणात राहील. पाहिजे तेवढाच वीजवापर करता येईल आणि बिलासंदर्भातील तक्रारी संपुष्टात येईल,’’ अशी माहिती पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.

स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये

वीजग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत देण्यात येईल. विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून वीज वापरता येईल. त्यामुळे वीज वापरावर किती खर्च करायचा, किती वीज वापरायची याचे नियोजन करणे ग्राहकांना शक्य होईल. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर टाळून आर्थिक बचत करता येईल. मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे. रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली, रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाईलद्वारे मिळत राहील. त्यानुसार वीजवापर व त्याचे आर्थिक नियोजन करणे शक्य होणार आहे.

विशेष म्हणजे स्मार्ट मीटरमधील रिचार्जची रक्कम सायंकाळी सहा ते सकाळी १० वाजेपर्यंत संपली तरी वीजपुरवठा सुरु राहील. मात्र संबंधित ग्राहकांनी दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत रक्कम भरून वीजपुरवठा सुरु ठेवणे आवश्यक आहे. भरलेल्या रकमेतून रिचार्ज संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील, अशी सुविधा आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest