File Photo
मुंबई : राज्याची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत मतभेद समोर येत आहेत. यावर महायुतीने प्रत्येक पक्षाचा एक प्रवक्ता नेमण्याचे ठरवले असून त्याची लवकरच घोषणा करणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. ते म्हणाले, परस्परविरोधी विधाने करणे चुकीचे आहे. त्यामुळे ते महायुती आणि पक्षाचेही नुकसान करत आहेत. आम्ही लवकरच तीन पक्षांचे तीन अधिकृत प्रवक्ते निवडणार आहोत. यानंतर हे प्रवक्ते बोलतील तेच अधिकृत असेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीबाबत ते म्हणाले, अशा जाहिराती बंद करण्याची आवश्यकता नाही. महायुतीत तीन वेगवेगळे पक्ष आहेत. पक्षांनी त्यांचं ब्रँडिंग केलं पाहिजे.
दोन्ही बाजूने होणाऱ्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीबाबत ते म्हणाले, शरद पवारांच्या डोक्यात कोण नाही, हे मला सांगता येईल. त्यांच्या डोक्यात कुणाचा चेहरा आहे, हे सांगणे सर्वात कठीण आहे.
एकनाथ शिंदे महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का? यावर फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत. जी व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर असते तीच निवडणुकीत नेतृत्व करते. आमचा मुख्यमंत्री असताना दुसऱ्या चेहऱ्याचा विचार होत नाही. विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होईल, याबाबत मी सांगू शकत नाही. तो अधिकार पक्षाच्या संसदीय मंडळाचा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा असेल. तो आम्हा सर्वांना मान्य असेल.
शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याबाबत शब्द दिलेला नाही असं समजायचं का? या प्रश्नावर ते म्हणाले, एकनाथ शिंदे विधानसभेनंतर मुख्यमंत्री होतील किंवा नाही याबाबतची चर्चा आमच्या स्तरावर होत नाही. त्या एनडीए आणि भाजपा कार्यकारिणीच्या स्तरावरील चर्चा आहेत. संसदीय मंडळ मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेईल. त्यांची याबाबत काही चर्चा झाली असेल तर ती काही काळाने आपल्यासमोर येईल. भाजपाचं संसदीय मंडळ, शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार मिळून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतील. ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल.
सुरत लुटण्याबाबतच्या वादावर ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोनदा स्वारी केली. महाराजांनी सामान्य माणसांना हातही लावला नाही. सुरत स्वारीपूर्वी शिवरायांनी एक प्रकारे त्यांना नोटीस पाठवली होती. खजिना वसूल केला, त्यानंतर महाराजांनी पावती दिली. याला लूट म्हणतात का? आपल्या बापाला लुटारू म्हणणारे हे कोण लोक आहेत? महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतवर स्वारी केली. महाराजांना लुटारू म्हणणं चुकीचं आहे. शरद पवार म्हणाले की, तुम्ही चुकीचा इतिहास सांगता, यावर फडणवीस म्हणाले, शरद पवारांना हे मान्य आहे का? महाराजांना लुटारू म्हणणं ? माझा राजा लुटारू नव्हता. माझ्यावर कितीही टीका करा मी ते मान्य करणार नाही.