संग्रहित छायाचित्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक ट्विट करून ते लिहितात की, "पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होऊ लागले आहे." तसेच "पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?" असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, या हल्ल्यामागे दुसरे तिसरे कोणी नसून वनराज आंदेकर यांची सख्खी बहिण आणि मेव्हणा असल्याचे समोर आले आहे. एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा रागातून बहिणीने वनराज यांना 'तुला पोरं बोलवून ठोकतेच' अशी धमकी दिली होती आणि त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सख्ख्या बहिणीनेच भावाचा गेम वाजवल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत.
याप्रकरणी संजीवनी जयंत कोमकर (रा. ३०९, नाना पेठ) जयंत लक्ष्मण कोमकर, प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड (रा. आंबेगाव पठार, धनकवडी) अनिकेत दूधभाते (रा. आंबेगाव पठार, धनकवडी), तुषार उर्फ आबा कदम (रा. धनकवडी) सागर पवार (रा. धनकवडी), पवन करताल (रा. मंगळवार पेठ) सॅम ऊर्फ समीर काळे यांच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर (वय ६८, रा. सोनाई दादा निवास, नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.