कैद्यांची दिवाळी गोड! पगारात मोठी वाढ
पुणे : राज्यतील कारागृहातील कैद्यांसाठी दिवाळीत आनंदाची बातमी समोर आली आहे. कारागृहातील कैद्यांच्या दर महा खर्चात वाढ (Prisoners Salary Increas) करण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. कैद्यांची गैरसोय आणि अडचण लक्षात घेता कैद्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कैद्यांच्या पगारात तब्बल दोन हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कारागृहातील कैद्यांना १ नोव्हेंबर पासून ८ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. याआधी ६ हजार रुपये पगार कैद्यांना दिला जात होता. मात्र कैद्याना उपहारगृहातून खरेदी करता यावं यासाठी खर्चात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta)यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
कारागृहात विविध गुन्ह्यांखाली शिक्षा झालेल्या ठरावीक कैद्यांना सुधारणा आणि पुनर्वसन योजनेंतर्गत विविध उद्योगांत आणि शेतीची कामे दिली जातात. नव्याने काम शिकणारा हा अकुशल, काही प्रमाणात कामे करणारा अर्धकुशल आणि माहितगार कैदी कुशल अशी वर्गवारी केली जाते. त्यानुसार कैद्यांना दैनंदिन कामाचा मोबदला दिला जातो. सरकारच्या निर्णयानुसार दर तीन वर्षांनी कैद्यांच्या मोबदल्यात (पगार) दहा टक्के वाढ करण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी कारागृहातील कैद्यांच्या पगारात वाढ करण्याचा आदेश प्रशासनाला दिला आहे.