मराठा आरक्षणावरून ओबीसी नेत्यांत मतभेद
मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्यावरून आता ओबीसी नेत्यांतच मतभेद निर्माण झाले आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण (OBC reservation) देण्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी कडाडून विरोध केला आहे. याऊलट ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade) यांनी भुजबळांविरोधात भूमिका घेत सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झाला नसल्याचा दावा केला आहे.
राज्य सरकारने कुणबी नोंदी आढळणाऱ्या मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला ओबीसी समूहाचे ताकदवान नेते भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांनी रविवारी (दि. २८) यासंदर्भात ओबीसी नेत्यांची एक बैठक बोलावली. त्यात सरकारच्या सगेसोयऱ्यासंबंधींच्या अधिसूचनेला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ओबीसीतील ३७४ जातींनी एकत्र येऊन १ फेब्रुवारी रोजी तारखेला आपापल्या आमदार, खासदार आणि तहसीलदारांकडे ओबीसी आरक्षणाचा बचाव करण्याचे निवेदन देण्याचे या बैठकीत ठरले आहे. तसे आवाहनही भुजबळ यांच्यासह इतर नेत्यांनी केले आहे. त्यानंतर ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी भुजबळ यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेणार असल्याचे स्पष्ट केले.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही : तायवाडे
बबनराव तायवाडे यांनीआपली भूमिका मांडताना राज्य सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणावर कोणताही आघात झाला नसल्याचाही दावा केला आहे. ‘‘सगेसोयरे मसुदा जुन्याच मसुद्याप्रमाणे आहे. यामुळे ओबीसींचे वाटेकरी वाढणार नाहीत. मराठा समाजातील कुणबी नोंदी ५७ लाख मिळाल्या आहेत. या नोंदी जुन्याच आहेत. नव्याने कुणबी प्रमाणपत्र वितरित केलेल्याची संख्या अत्यंत कमी आहे,’’ असे तायवाडे यांनी जोर देऊन म्हटले आहे. तायवाडे यांच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणावरून ओबीसी नेत्यांतच मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
भुजबळांसोबत चर्चा करून गैरसमज दूर करू : अजित पवार
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. मात्र, आरक्षणाच्या अधिसूचनेवरून महायुती सरकारमध्येच काही मतमतांतरे दिसू लागली आहेत. एकीकडे छगन भुजबळ यांच्याकडून ओबीसींविषयी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय. दुसरीकडे पंकजा मुंडे यादेखील सरकारच्या निर्णयानंतर ओबीसींवर अन्याय झाल्याचं बोलत आहेत.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सारवासारव करणारी प्रतिक्रिया दिली. ‘‘एकाच घरातील दोन भावांमध्ये मतमतांतरे, मतभेद असतात. परंतु चर्चा करून त्यांचे एकमेकांविषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच, वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. प्रत्येकाची भूमिका आणि विचार वेगवेगळे असतात. त्यावर चर्चा करून मार्ग काढता येतो. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घेतली. जर गैरसमज असतील तर त्यावर चर्चा करून ते दूर केले जातील. फडणवीसदेखील भुजबळांशी बोलणार आहेत. कोणावर अन्याय झाला असे मला वाटत नाही. परंतु, त्यांचे काही प्रश्न असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू.’’
ओबीसी आरक्षणात बलदंड लोक आले, आमचे आरक्षण संपले : भुजबळ
राज्य सरकारच्या मराठा आरक्षणासंबंधीच्या भूमिकेमुळे ओबीसींचे आरक्षण गेल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. आमच्या आरक्षणात आता बलदंड लोक आलेत. ते आमचे आरक्षण घेऊन जातील. आमचे आरक्षण आता संपुष्टात आले हे सांगण्यास कोणतेही तत्वज्ञान मांडण्याची गरज नाही, असा संताप त्यांनी सोमवारी (दि. २९) व्यक्त केला. भुजबळ यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ‘‘तुम्ही सरकारमध्ये राहून ओबीसी आरक्षणाची लढाई लढणार की बाहेर पडून,’’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर भुजबळ संतापले. ‘‘यासंबंधीचा निर्णय माझ्या पक्षाने घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. मला त्याची कोणतीही चिंता नाही. मला ओबीसी प्रश्नाचे दुःख आणि संताप आहे. याशिवाय दुसरी कोणतीही अभिलाषा नाही. तुम्हीच त्यांना मला काढा म्हणून सांगा,’’ असे ते पत्रकारांना उद्देशून म्हणाले.
ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात मी एकाकी नाही. राज्यासह देशभरातील कोट्यवधी ओबीसी बांधव माझ्यासोबत आहेत. येथे मंत्रिमंडळातील हुद्द्याचा कोणताही संबंध नाही. असेही भुजबळ यावेळी आपला संताप व्यक्त करताना म्हणाले. भुजबळ यांनी यावेळी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या भूमिकेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘तायवाडे यांचे समर्थन नाही तर नाही. आमच्यात विविध जातींचे ३७४ वाटेकरी होते. आता हजार वाटेकरी झालेत. यामुळे आमचा वाटा कमी झाला, एवढे हे साधे गणित आहे. यासाठी कोणतेही मोठे तत्त्वज्ञान मांडण्याची गरज नाही. ओबीसींच्या ५४ टक्क्यांत आणखी २०-२५ टक्के घुसवले तेही बलंदड. विमुक्त भटके जमातीतील लोक असतील किंवा इतर ओबीसी जाती असतील या सर्वांचे आरक्षण आता हे बलदंड लोकं घेऊन जातील. यामु्ळेच मी बोलत आहे.’’