संग्रहित छायाचित्र
मुंबई: प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उत्तर प्रदेशातील अयोध्यादरम्यान विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २९ ऑगस्ट २०२४ पासून विशेष ट्रेन सुरू केली जाणार आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक ०१०१९ येत्या २९ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.२० वाजता सुटेल. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी अयोध्येतून ३१ ऑगस्टला रात्री ११.४० ला निघेल आणि १ सप्टेंबरला सकाळी ८.१५ मुंबईत पोहोचेल.
कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर आणि लखनऊ स्थानकांवर गाडी थांबेल. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सोमवारी या गाडीसाठीचे आरक्षण खुले होणार आहे.
'या' गाड्यांच्या वेळेत बदल
रेल्वेगाड्यांचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी साप्ताहिक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत, ज्यात पुणे-सीएसएमटी डेक्क्न एक्स्प्रेस ( गाडी क्रमांक- ११००८), नागरकोविल-सीएसएमटी (गाडी क्रमांक- १६३५२), तिरुवनंतपूरम-सीएसएमटी (१६३३२) या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांच्या वेळेत ५ ते १५ मिनिटांचा बदल करण्यात आला आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी सुधारित वेळेची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. गाड्यांची सुधारित वेळ आणि अंमलबजावणीच्या सविस्तर माहितीसाठी मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आहे.