संग्रहित छायाचित्र
नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत तब्बल २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे.
ही बाब सोमवारी (दि. २) उघडकीस येताच मोठा गोंधळ उडाला. शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या २४ रुग्णांपैकी सर्पदंश आणि विषबाधेमुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस. आर. वाकोडे यांनी मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णांचा जास्तीचा समावेश होता, असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे त्यांच्या विरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच विरोधी पक्षांनी केली आहे.
मागील २४ तासांत दगावलेल्या १२ नवजात बालकांमध्ये प्रत्येकी सहा मुले आणि ६ मुलींचा समावेश आहे. इतर १२ जण प्रौढ आहेत. या रुग्णालयात किरकोळ आजारासह प्रामुख्याने सर्पदंश झालेले रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी मुंबईच्या हाफकिन संस्थेच्या माध्यमातून सर्पदंशावरील औषधे मागवली जातात. सध्या काही प्रमाणात येथे सर्पदंशावरील औषधांची कमतरता आहे. मात्र, रुग्णांच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरदेखील सर्पदंशावरील औषध मागवून रुग्णावर उपचार केले जातात. मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचारांसाठी येथे येत असल्याने रुग्णालयावर ताण आला असल्याचे स्पष्टीकरण नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस. आर. वाकोडे यांनी दिले आहे.
औषधांचा तुटवडा कारणीभूत?
औषधे आणि मनुष्यबळाचा तुटवडा ही या मृत्यूमागील प्रमुख कारणे असल्याचा दावा नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून केला जात आहे. नांदेड परिसरात एकही मोठे रुग्णालय नाही. त्यामुळे या भागातील सर्वच रुग्णांचा ओढा डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाकडे असतो.
या रुग्णालयात नांदेड जिल्ह्यासह लगतच्या परभणी, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यातील रुग्णांबरोबरच तेलंगणा राज्यातील शेकडो रुग्णदेखील येतात. त्यातच ही घटना घडल्यामुळे या भागात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता एस. आर. वाकोडे यांनी ‘’मृतांमध्ये बाह्य रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे,’’ असे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या असंवेदनशिलतेवर सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बाहेरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारांसाठी येत असल्याने रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला, असे कारण रुग्णालयाच्या प्रशासनाने दिल्यानंतर त्यावरदेखील उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
ठाण्यातही घडली होती अशीच घटना
ठाण्यातील कळवा रुग्णालयात ३६ तासांत २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातच ही घटना घडल्याचे उघडकीस आल्यावर त्याचे राजकीय पटलावर तीव्र पडसाद उमटले होते. विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकामासाठी बंद करण्यात आल्यामुळे तेथील रुग्णांचा अतिरिक्त ताण कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर पडला होता. त्यातून ही घटना घडल्याचा दावा प्रशासनाने केला होता. या प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली होती. त्याला दोन महिने उलटत नाही तोच नांदेडमध्ये २४ जणांचा जीव गेल्याने राज्याच्या आरोग्य खात्याचीच प्रकृती बिघडली असल्याची टीका होत आहे.