संग्रहित छायाचित्र
अमरावती: गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आमदार, खासदार, मंत्र्याना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी पाकिस्तान व अफगाणिस्तानमधून धमकी आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. नवनीत राणा यांना 3 मार्च रोजी व्हॉट्सअॅपवर क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कलम ३५४ ए, ३५४ ड, ५०६ (२) ६७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही खासदार नवनीत राणा यांना धमक्या आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा यांना एका परदेशी नंबरवरुन धमकी देणारी व्हॉट्सअॅपला एक ऑडिओ क्लीप आली होती. या क्लीपमध्ये नवनीत राणा यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जवळपास तीन मिनिटांची ही ऑडिओ क्लीप आहे.
जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांना आंतरराष्ट्रीय कॉल करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.क्लीप बनविणाऱ्याने असभ्य भाषेचा वापर केला असून त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) तसेच सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांचा नामोल्लेख करून धमकी देण्यात आली आहे.
खासदार राणा यांचे स्वीयसहायक विनोद पुंडलिक गुहे यांनी त्यासंदर्भात शहरातील राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. गुहे यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.दुपारी २ वाजून ९ मिनिटांनी ही ऑडिओ क्लीप नवनीत राणा यांना आली होती. त्यानंतर २ वाजून १३ मिनिटाने याच नंबरवरुन व्हॉट्सअप व्हाईस कॉल आला, जो नवनीत राणा यांनी उचलला नाही. त्यानंतर पुन्हा दुपारी आणखी एक ऑडिओ क्लीप आली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही नाव या ऑडिओ क्लीपमध्ये घेण्यात आले आहे. अफगाणिस्तानने अमेरिकेची जशी वाट लावली तशीच भारताचीही आम्ही वाट लावू शकतो. आम्ही ठरवले तर क्षणात काहीही करु शकतो, अशी धमकी देण्यात आली आहे.
प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न
सोशल मीडियावरून खासदार नवनीत राणा यांच्या फोटोचा गैरवापर करून प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने शहरातील एका संशयिताने सोशल मीडियावरून काही पोस्ट टाकून त्यांची बदनामी करण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप विनोद गुहे यांनी राजापेठ ठाण्यात दाखल दुसऱ्या तक्रारीत केला आहे. त्याआधारेही संशयितांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.