मर्शिडीज अन् थार सोडून नेटकऱ्यांना मिनी लालपरीची भुरळ
अनेक मोठ्या मोठ्या आलिशान कारच्या मिनी कार आपण खेळण्यात पाहतो. मर्सिडीज, थार यांच्या प्रतिकृती बाजारात सर्रास उपलब्ध असतात. मात्र मागील शंभर वर्षांपासून सर्व सामान्यांच्या हक्काच्या लालपरीची देखील मिनी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. अकोल्यातील महाविद्यालयीन तरुण पियुष राऊत यांनी ही मिनी लालपरी तयार केली आहे आणि महत्वाचं म्हणजे या मिनी लालपरीसाठी एसटीच्याच खराब झालेला पत्रा व इतर साहित्यांचा वापर केला आहे. दरम्यान या रेसिंग कारच्या युगात या अनोख्या एसटीप्रेमी तरुणाची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे.
पियुष याने तयार केलेली ही मिनी लालपरी लवकरचं अकोला शहरालीत बस स्थानकावर दिसणार आहे. ही बस तयार करण्यासाठी त्याला एक महिण्याचा कालावधी लागला असून एसटीच्याच खराब झालेला पत्रा व इतर साहित्यांचा वापर करून पियुषने ही बस तयार केली आहे. यासाठी त्याला अकोला एसटी प्रशासनाकडून सुद्धा मदत करण्यात आली आहे.
शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात सातत्याने लालपरीनेच प्रवास करावा लागला त्यातूनच पियुषला ही आवड निर्माण झाली आणि मिनी लालपरीचा जन्म झाला. पियुषने तयार केलेली ही मिनी बस अकोल्यातील एसटी स्थानकावर सेल्फी पॉईंटला ठेवण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या स्वच्छ व स्थानक या योजनेसाठी राज्यातील सर्व एसटी स्थानकांवर सेल्फी पॉइंट करण्याची इच्छा असल्याचे पियुष सांगतो.