संग्रहित छायाचित्र
राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी काही राजकीय पक्षांशी संबंधित असलेली विद्यार्थ्यांची आणि खासगी क्लासेसची टोळी पुण्यात सक्रिय आहे. या टोळीमुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या टोळीला आवर घालून कोणत्याही दबावाला बळी न पडता परीक्षेचे वेळापत्रक पाळा. अन्यथा याविरोधात न्यायालयात जावे लागेल, असा इशारा राज्यसेवा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एमपीएससीला दिला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर (एमपीएससी) सातत्याने राजकीय दबाव आणला जात आहे. आंदोलन करून विविध मान्य केल्या जात आहेत. स्वायत्त संस्था असलेली एमपीएससीदेखील या दबावाला बळी पडत असून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यात राज्यसेवा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एमपीएससीला पत्र दिले आहे. या पत्रामुळे विद्यार्थ्यांचा रोष बाहेर पडू लागला असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
कृषी विभागातील राजपत्रित अधिकारी गट अ आणि गट ब मधील मंजूर २५८ पदांचा समावेश राज्य सेवा परीक्षेत करावा, आयबीपीएस परीक्षा आणि राज्य सेवा एकाच दिवशी आल्याने २५ ऑगस्ट रोजी होणारी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मुख्य मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतर एमपीएससीने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पण विद्यार्थ्यांची मूळ मागणी कृषीच्या पदांचा समावेश करण्याबाबत होती. ती मान्यच झाली नाही. त्यामुळे आंदोलनाला यश आले असे बोलले जात असले तरी नेमके काय हाती लागले, असा प्रश्न आता विद्यार्थीच उपस्थित करू लागले आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन सहभागी होत रात्रभर ठिय्या मांडला होता. त्यांनादेखील खरे राज्यसेवा देणारे विद्यार्थी आणि राजकीय कार्यकर्ते यांच्यातील फरक समजला नाही. त्यांनी कधीही एमपीएससीची परीक्षा दिल्याचे माहिती नाही. त्यांना विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा केवळ राजकीय फायदा दिसला, म्हणून ते ठाण मांडून बसले होते. असा आरोप विद्यार्थ्यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना केला. यापुढे एमपीएससीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या स्वयंघोषित पुढाऱ्यांवर बंदी घालण्याचीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच आयुष्याचा प्रश्न असलेल्या मुद्द्याचे राजकारण होऊ नये, अशी भावना विद्यार्थ्यांनी ‘सीविक मिरर’कडे व्यक्त केली आहे.
राजकीय प्रतिनिधीमार्फत येणाऱ्या निवेदनाची पडताळणी करण्याची मागणी
शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करतात. परंतु सध्या पुण्यामध्ये काही मोजक्या मुलांचा एक गट तयार झाला आहे. त्यांचा प्रमुख उद्देश प्रसिद्धीसाठी एमपीएससीवर दबाव आणणे आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रेरित करणे. हा गट राजकीय नेत्यांना हाताशी धरून निवेदन तयार करतो आणि सामान्य प्रशासन विभागामार्फत एमपीएससीला पाठवतो. ही निवेदने म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची मागणी नसते तर फक्त त्या दोन-तीन विद्यार्थ्यांचीच मागणी असते. अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षा पुढे ढकलणे, राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे गेली नाही तर जागा वाढणार नाहीत, असे सांगून विद्यार्थ्यांना गोळा करून आंदोलन करायला लावतात. त्यामुळे राजकीय नेत्यांनी निवेदन दिल्यास त्याची आधी पडताळणी करावी. ही संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांची मागणी आहे का, हे तपासल्यावरच त्यावर निर्णय घ्यावा. कारण एमपीएससीच्या परिपत्रकावर विश्वास ठेवून विद्यार्थी अभ्यास करत असतात. या गटाच्या कृतीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, असे विद्यार्थ्यांनी एमपीएससीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
न्यायालयाकडे दाद मागणार
पुण्यातील आंदोलनात केलेली कोणतीही मागणी मान्य झाली नाही. केवळ परीक्षा पुढे ढकलण्यात आली. एमपीएससीला राजकीय पक्षांनी निवेदन दिले, त्याची एमपीएससीने त्याची साधी तपासणीसुद्धा केली नाही. आंदोलनामध्ये खरंच विद्यार्थी सामील आहेत की राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, याची पाहणी करणे आवश्यक होते. पुण्याची सदाशिव पेठ, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि कोचिंग क्लासचालक हेच म्हणजे एमपीएससी नाही. पुण्यामध्ये मागील आठ ते दहा वर्षांपासून जे विद्यार्थी तयारी करत आहेत, त्यांची राजकीय नेते आणि प्रतिनिधींसोबत हितसंबंध जोडले गेले आहेत. काही मोजक्या विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन ते राजकीय नेत्याकडे जातात. त्या मागण्यांचे पत्र किंवा विषय एमपीएससीला सादर करायचा, असा गोरखधंदा सुरू आहे. त्याला एमपीएससी बळी पडत आहे. एमपीएससी ही एक आता राजकीय नेत्यांच्या हातातील बाहुले होत चाललेली संस्था ठरू लागली आहे. तिचा स्वायत्त दर्जा टिकावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी आता थेट न्यायालयात जाण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी एमपीएससीला पत्राद्वारे दिला आहे.
...तर एमपीएससीचा स्वायत्त दर्जा काढून घ्या
राज्यातील विद्यार्थ्यांचा विचार करून एमपीएससीने विचार करणे अपेक्षित होते. पण पुण्यातील काही विद्यार्थ्यांच्या गटामुळे तसेच आंदोलनात राजकीय कार्यकर्त्यांसह नेत्यांचा शिरकाव झाल्यानेच परीक्षा पुढे गेले. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. पोटाला चिमटा काढून आईवडील मुलांना पुण्यात पाठवतात. तसेच अनेक विद्यार्थी एक वेळच्या जेवणावर दिवस काढत असून रात्रीचा दिवस करून अभ्यास करत आहेत. पण याचा कोणताही विचार विरोधी पक्ष अथवा सत्ताधारी पक्ष करत नाहीत. राजकीय फायद्यासाठी विद्यार्थांचा फायदा घेतला जात आहे. याला एमपीएससीने बळी पडू नये, तसेच राजकीय दबावाला बळी पडूनच काम करायचे असेल एमपीएससीचा स्वायत्त दर्जा काढून घ्यावा आणि राजकीय पक्षाप्रमाणे ती चालवावी असा संताप परभणी जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने ‘सीविक मिरर’शी बोलताना व्यक्त केला.
विद्यार्थी म्हणतात...
- पुण्यात २० ते २३ ऑगस्टदरम्यान पुण्यामधील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रेरित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात यावी.
- पुण्यामध्ये जे एमपीएससीच्या विरोधात आंदोलन झाले त्यांची प्रमुख मागणी परीक्षा पुढे ढकलणे ही नव्हती तर जागावाढ ही होती. नंतर जागावाढ हा विषय मागे पडला आणि परीक्षापुढे ढकलण्यावरच भर देण्यात आला.
- एमपीएससी क्षेत्रामध्ये पुण्यातील जे काही तथाकथित टेलिग्राम चालक आणि कोचिंग क्लासेसचालक यांनी जोपर्यंत परीक्षा पुढे जात नाही, तोपर्यंत जागा वाढ होऊ शकत नाही, असे विद्यार्थ्यांना त्यांच्या टेलिग्रामच्या माध्यमातून सांगितले.
- परीक्षा पुढे ढकलण्यासंबंधी एमपीएससीवर दबाव आणायला सुरुवात केली. आंदोलन अधिक तीव्र व्हावे म्हणून यामध्ये कोचिंग क्लासचालकांनी राजकीय लोकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळी येण्यासाठी प्रेरित केलं. त्यांना शोधून कारवाई करावी.
विरोधी पक्षाच्या चक्रव्यूहात अडकले 'अभिमन्यू', 'चाणक्य'ही फसले
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर याचा फायदा विरोधी पक्षाला झाला असल्याचे सांगितले जात आहे. पण परीक्षा पुढे गेल्याने तब्बल दोन लाख विद्यार्थी नाराज आहेत. याच विद्यार्थ्यांनी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमदार अभिमन्यू पवार नेहमी धावून येतात. तसे ते या आंदोलनावेळीदेखील धावून आले. पण त्यांना विरोधी पक्षाने आखलेला डाव ओळखता आला नसल्याने ते चक्रव्यूहात अडकले. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचा कोणताही विचार न करता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत परीक्षा पुढे घेण्याचा सल्ला दिला. फडणवीस यांच्या विनंतीमुळे एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलली. त्यामुळे दोन लाख विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. याचा मोठा फटका विधानसभेला होऊ शकतो, असा इशारा देत 'अभिमन्यू स्वत: चक्रव्यूहात अडकले अन् राजकारणातील 'चाणक्य'ही फसले, असे आता विद्यार्थी बोलू लागले आहेत.
टेलिग्राम ॲडमिन, राजकीय नेते आणि पुण्यातील कोचिंग क्लासचालकांपासून वाचवा - विद्यार्थी
एमपीएससीने राज्यसेवेसाठी नवीन वर्णनात्मक पॅटर्न आणल्यामुळे पुण्यातील क्लासचालकांची सर्व दुकाने बंद पडणार आहेत. कारण हा पॅटर्न यांना शिकवता येत नाही. आतापर्यंत डिजिटल बोर्डवरील पीपीटी वाचून शिकवण्याचे हे काम करत होते. यांच्याकडे लेखनकौशल्य नसल्यामुळे क्लास बंद पडण्याची भीती आहे. त्यामुळे हा गट वारंवार एमपीएससीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतो. या गटाकडून सातत्याने एमपीएससीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे एमपीएससीने आम्हाला टेलिग्राम ॲॅडमिन, राजकीय नेते आणि पुण्यातील कोचिंग क्लासचालकांपासून वाचवावे, अशी गळ विद्यार्थ्यांनी एमपीएससीला घातली आहे.
एमपीएससी ही घटनात्मक संस्था असून पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणे परीक्षा घेण्याचे काम करते. याबाबत आमच्या मनात कोणतेही दुमत नाही. परंतु सध्या पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये एमपीएससीवर दबाव आणणारी जी टोळी निर्माण झाली आहे. त्यामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात एक गट असासुद्धा आहे की, जो फक्त एमपीएससीच्या नोटिफिकेशनवर विश्वास ठेवतो. परंतु हा गट त्यालासुद्धा प्रमाण न मानता त्यात बदल कसा होईल, यासाठी प्रयत्नशील असतो. राज्यसेवेच्या लेखी परीक्षेच्या पॅटर्नसाठी दोन वर्ष अतिरिक्त मिळावे यासाठी केलेले आंदोलन असो की, आता नुकतीच परीक्षा पुढे ढकला या मुद्द्यावर आंदोलन असो. या गटापैकी कोणीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत नसल्याची माहिती आहे, हे विशेष. फक्त प्रसिद्धीसाठी आणि राजकीय झोतामध्ये येण्यासाठी पुण्यामध्ये जे अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, त्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हे एमपीएससीवर दबाव आणतात, अशी माहिती राज्यसेवा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘सीविक मिरर’ला दिली. अशाप्रकारे विद्यार्थ्यांचा वापर केला जात आहे. वारंवार परीक्षेत अपयश येत असूनसुद्धा हे क्षेत्र आपल्यासाठी नाही, हे त्यांना समजत नाही. परंतु यामुळे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.