संग्रहित छायाचित्र
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सोलापूर शहर मध्य विधानसभा जागेवर काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांचा वारसदार ठरविण्यासाठी महाविकास आघाडीत चढाओढ वाढली. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप व शिवसेनेत (शिंदे) दावेदारी कायम आहे, तर सोलापूर दक्षिण मतदारसंघात भाजपने आमदार सुभाष देशमुख यांना तिसऱ्यांदा संधी दिली असताना त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाने अमर रतिकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले वजनदार नेते धर्मराज काडादी हे पेचात सापडले आहेत.
सोलापूर शहर मध्य जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत (शिंदे) ताणाताणी वाढली असताना, दोन्ही पक्षांतर्गतही उमेदवारीसाठी शह-प्रतिशहाचे राजकारण सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे बंधू तथा पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत आणि पक्षाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यात स्पर्धा लागली आहे. यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. दुसरीकडे ही जागा भाजपकडे गेल्यास त्या विरोधात बंड करण्याची भूमिकाही काळजे यांनी घेतली आहे. मात्र त्याची दखल महायुतीमध्ये कितपत घेतली जाईल, याबाबत प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये येऊन धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयोगाच्या हेतूने धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करून कायद्याच्या कसोट्यात अडकलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे देवेंद्र कोठे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असताना त्यांच्या विरोधात पक्षातील अन्य मंडळी एकत्र आली आहे, तर महाविकास आघाडीमध्ये या जागेवर माकपचे नेते, आमदार नरसय्या आडम यांनी येत्या २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी वाद वाढला आहे.
सोलापूर दक्षिणमध्ये वीरशैव लिंगायत समाजातील वजनदार नेते, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी गृहीत धरून गावभेटीवर जोर लावला आहे. परंतु त्याचवेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने या जागेवर हक्क सांगत अमर रतिकांत पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये गोंधळाचे वातावरण दिसून येते. या पार्श्वभूमीवर धर्मराज काडादी यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.