संग्रहित छायाचित्र
बहुजन विकास आघाडीने भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच तावडे यांना रंगेहात पकडल्याचा दावा केला जात असून नालासोपारा मतदारसंघात वातावरण तापले आहे.
महाराष्ट्रात २८८ मतदारसंघात एकाच टप्प्यात उद्या २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. अशातच नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. नालासोपारा मध्ये भाजपचे राजन नाईक, काँग्रेसचे संदीप पांडे आणि बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर यांच्यात सामना रंगणार आहे. नालासोपारा मतदारसंघात मतदानाच्या एकदिवस आधीच जोरदार राडा झाला आहे.
विनोद तावडे मंगळवारी विरार पूर्व येथील मनोरीपाडा येथील हॉटेल विवांत येथे आले होते. त्यांच्यासोबत भाजप उमेदवार राजन नाईक हे देखील होते. तावडे यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असताना बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. कार्यकर्त्यांनी तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला. त्यानंतर मोठा राडा झाला. कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.
दुसरीकडे बहुजन विकास आघडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांनी आपली माफी मागितली असल्याचा दावा केला आहे. तर विनोद तावडे यांनी बहुजन विकास आघाडीचे आरोप फेटाळून लावले आहेत.