संग्रहित छायाचित्र
छत्रपती संभाजीनगर: येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. थेट मारामारी झाल्याने बैठकीला गालबोट लागलं आहे. निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचा स्वतंत्र उमेदवार देण्यात येणार आहे. बैठकीत कोणीही कोणाचे नाव सुचवू नये असे बैठकीआधी ठरले होते. काहीजणांनी नावे सुचविल्यावरून मारामारीस प्रारंभ झाला. राज्यातील १७ ते १८ मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य असल्याने तेथे अपक्ष उमेदवार उभे करण्याची भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे. याबाबतचा निर्णय जरांगे पाटील उद्या, शनिवारी (३० मार्च) ते जाहीर करणार आहेत.
त्यापूर्वी आपापल्या जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन उमेदवार निश्चित करावा, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक बोलावली होती. बैठकीत कुणीही कुणाचं नाव पुढे करायचं नाही, असे ठरलं होतं. परंतु काहीजणांनी उमेदवारीसाठी आपल्या जवळच्यांची नावं पुढे केली. बैठकीचा प्रोटोकॉल तोडल्यामुळे आणि काहींना तुम्ही बैठकीला का आलात, असा प्रश्न विचारल्यामुळे वादास प्रारंभ झाला. त्याचे रूपांतर शेवटी मारामारीत झाले. बैठकीनंतर पदाधिकारी म्हणाले की, आम्ही मनोज जरांगे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. परंतु काहींनी विनाकारण आपल्या लोकांची नावं पुढे करण्याचा प्रयत्न केला.
उमेदवार ठरवण्यावरून झालेल्या वादामुळे मनोज जरांगे काय निर्णय घेतात, हे पाहणे आता महत्त्वाचे आहे. मराठा समाज देणार असलेला उमेदवार हा केवळ मराठा असणार नाही तर तो दलित, मुस्लीम, धनगर समाजातील असणार आहे. त्याच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन जरांगेंनी केलं होते. परंतु आता मराठा समाजामध्येच तू-तू... मैं-मैं झाल्याने या निर्णयाचे आता पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मराठा समाजातर्फे उमेदवार ठरवण्यासाठी हडकोतील मराठा मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत इच्छुकांनी उमेदवार नावे जाहीर करावे व सूचना मांडावी असे सांगण्यात आले होते. याचवेळी खाली बसलेल्या विकी राजे नावाचा तरुण काही तरी बोलला. त्याला आक्षेप घेत बैठकीतील काहीजणांनी मारहाण केली. येथूनच बैठकीत मोठा गोंधळ निर्माण झाला. या बैठकीचा निरोप सर्वांना मिळालेला नव्हता मात्र काहींना फोनवर बोलवण्यात आले. बैठक सुरू झाल्यावर सर्वांना निरोप का देण्यात आला नाही, असा प्रश्नही काहीजणांनी विचारला. त्याचवेळी एका उमेदवारातर्फे एका महिला उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्याने सर्वांनी त्याला विरोध केला. यावेळी काही उमेदवारांनी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे नाव सुचवले. त्याचवेळी चंद्रकांत खैरे यांची सुपारी घेऊन काहीजण बैठकीत आले असल्याचा आरोप केला. नेमका तेव्हापासूनच गोंधळ सुरू झाला. सुपारी घेणाऱ्यांची नावे जाहीर करा, असे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर काही तरुण थेट विकी राजे यांच्याकडे जात त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान विकी राजे याने प्रस्थापित लोकांनाच उमेदवारी व त्यांचीच नावे समोर येत असल्याचा आरोप करत त्यांच्या लोकांनी मला मारहाण केली असल्याचे सांगितले. काहीच बोललो नसल्याचेही त्याचे म्हणणे पडले. दरम्यान, विकी राजे यांनी खाली बसून शिवीगाळ केली असल्याचा आरोप काहीजणांनी केला, त्यामुळे मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.