संग्रहित छायाचित्र
ठाणे : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात जुंपली आहे. युती धर्म पाळण्याचा ठेका रवींद्र चव्हाण यांनी घेतलेला नाही. रामदास कदम आपणास विनाकारण लक्ष्य करत असतील तर जशास तसे उत्तर देण्यास आणि प्रसंगी वाईट वागण्यासही तयार असल्याचा इशारा चव्हाण यांनी दिला.
कदम यांनी रविवारी ठाण्यात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य केल्यावर संतप्त झालेले चव्हाण म्हणाले, गेल्या ४० वर्षांच्या काळात रामदास कदम आमदार, मंत्री म्हणून कोकणचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या काळात विकास कामे सोडाच, पण इतर कोणते विकास कामांचे कोणते दिवे लावले ते स्पष्ट करावे.
मंत्री चव्हाण यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम डोंबिवलीत आयोजित केला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, मुंबई-गोवा महामार्ग हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील विषय आहे. कोकणचा सुपुत्र म्हणून आपण या रखडलेल्या रस्त्यात लक्ष घालून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघासाठी हजारो कोटींचा निधी विकास कामांसाठी दिला. याबद्दल कदम पिता-पुत्रांनी आपले कौतुक करायला हवे. ते राहिले बाजूला, उलट मलाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न असेल तर जशास तसे उत्तर देण्यास रवींद्र चव्हाण समर्थ आहे. त्यासाठी कदम यांनी ठिकाण सांगावे, तेथे मी येईन. युती धर्म पाळण्याचा फक्त रवींद्र चव्हाण यांनी ठेका घेतला नसल्याचे सांगून ते म्हणाले, युती धर्म पाळणे युतीमधील सर्व नेते, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. भाजप म्हणून आपण अतिशय संयम, सौजन्याची भूमिका घेऊन विकास कामे, लोकांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत. रामदास कदम आपणास विकास कामांच्या विषयावरून लक्ष्य करत असतील तर सौजन्याचा मार्ग बाजूला ठेऊन आपण जशास तसे उत्तर देण्यास आणि प्रसंगी वाईट वागण्यासही तयार आहोत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात रामदास कदम मंत्री होते. अनेक वर्षे ते कोकणाचे नेतृत्व विधिमंडळात करतात. या ४० वर्षांच्या कालावधीत त्यांनी कोकणासाठी काय आणि कोणती कामे केली. विकास कामे सोडाच, पण कोणते दिवे लावले, असा प्रश्न मंत्री चव्हाण यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांना अनावश्यक महत्त्व दिल्याने ते मोठे झाले, असेही चव्हाण म्हणाले.