बदलापूर स्टेशनवरील आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलकांकडून दगडफेक
बदलापूर स्टेशनवरील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची माहिती मिळत आहे. आंदोलकांनी तोडफोड तसेच दगडफेक केल्याचे समोर आले आहे.
बदलापुर येथील एका नामांकित शाळेत शिपायाकडून दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. मंगळवारी स्थानिक नागरिकांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. संतप्त पालकांनी या घटनेचा निषेध करताना उस्फूर्त रेल रोको आंदोलन केलं.
दरम्यान, या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची माहिती मिळत आहे. काही आंदोलकांनी शाळेचं गेट तोडून शाळेत प्रवेश केला आणि तोडफोड केली. तर जमावाला हटवण्यासाठी शाळेच्या बाहेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्याची माहिती मिळत आहे.
तर बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचं समोर आलं आहे. बदलापूर रेल्वे ट्रॅकवरून आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्व पालक विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गेले होते. तेथे त्यांनी आंदोलन केलं. चिमुकल्या मुलींना न्याय मिळावा आणि आरोपीला फासावर लटकवा अशा घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर संतप्त पालक आंदोलकांचा जमाव दहा वाजण्याच्या सुमारास विद्यालयाकडून थेट बदलापूर रेल्वे स्थानकावर गेला आणि त्यांनी उस्फूर्त रेल रोको आंदोलन केलं. पालकांचा संताप अनावर झाल्याचं यावेळी बघायला मिळालं आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, तीन तासांपेक्षा अधिक काळ हे आंदोलन सुरू आहे. पोलिस प्रशासनाकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.