संग्रहित छायाचित्र
मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिकांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
तसेच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, असंदेखील त्यांनी सांगितले आहे.दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक शहरांमध्ये पाणीदेखील साचले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. महत्त्वाचे म्हणजे, हवामान विभागाने आजसुद्धा राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.