Bhima Koregaon: भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात राबवली स्वच्छता मोहीम
पुणे : १ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त राज्यासह देशभरातून सुमारे १५ लाख पेक्षा अधिक भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास (Vijaystambha) अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी २ जानेवारी रोजी विजयस्तंभ परिसरामधे स्वच्छता रहावी व स्थानिक रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेतला. या वेळी परिसरातील कचरा, पाण्याच्या बॉटल, कागद आदी उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. (Pune)
या स्वच्छता उपक्रमात क्टेलिस्ट फाउंडेशनचे सुनिल माने व सहकारी, बीबीसीचे सहकारी, भीम युवा संघ, महिला संघटना, विजय कांबळे, संदिप चाबुकस्वार, भंते नागघोष सर्व भीम सहकारी यांनी पुणे मनपा आरोग्य विभाग, स्वच्छ संस्था, आधार पुनावाला समुह, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पेरणे ग्राम पंचायत आदींच्या सोबत परिसर स्वच्छ करून घेतला.
या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, भीमा कोरेगावला ऐतिहासिक वारसा आहे. त्यांच्या आठवणींचे जतन भीम अनुयायी करत असतात. ही ऐतिहासिक आठवण स्मरणात रहावी, यासाठी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. त्याला लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. एवढ्या प्रचंड संख्येनंतर या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी देखील आपलीच आहे, या सामाजिक भावनेतून परिसरात स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. गेल्या 10 वर्षांपासून स्वच्छतेच्या उपक्रमासाठी पुढाकार घेत असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. त्याला यश फाउंडेशन, क्रिस्टल संस्था, आयुष आंबेडकरी युवा संघ, स्वच्छ संस्था, आधार पुनावाला संस्था, पेरणे ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी या सामाजिक संघटनांची देखील मोलाची साथ मिळत असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.