पडद्याआडून: दिंडोरी लोकसभा मतदारसंघ -  जायंट ‘गुरुजी’!

दिंडोरी मतदारसंघात २००९ पासून २०१९ पर्यंत भारतीय जनता पक्ष विजयी झाल्याने हा भाजपचा गड असल्याचे मानले जाते. मात्र, येथे शरद पवार यांना आणि डाव्या विचारांना मानणारे मतदारही मोठ्या प्रमाणावर आहेत. कांदा प्रश्नावर नाराज असलेल्या मतदारांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांना पराभूत करून एका सामान्य कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवले. शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले भास्कर भगरे गुरुजी खऱ्या अर्थाने जायंट गुरुजी ठरले.

Maharastra News, Dindori Constituency,  BJP, Sharad Pawar, Bhaskar Bhagare,  Union Minister of State, Giant Guruji

संग्रहित छायाचित्र

दिंडोरी मतदारसंघात २००९ पासून २०१९ पर्यंत भारतीय जनता पक्ष विजयी झाल्याने हा भाजपचा गड असल्याचे मानले जाते. मात्र, येथे शरद पवार यांना आणि डाव्या विचारांना मानणारे मतदारही मोठ्या प्रमाणावर आहेत. कांदा प्रश्नावर नाराज असलेल्या मतदारांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांना पराभूत करून एका सामान्य कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवले. शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले भास्कर भगरे गुरुजी खऱ्या अर्थाने जायंट गुरुजी ठरले.

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा लाखाहून अधिक मतांनी करणारे भास्कर भगरे शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते. त्यांच्याकडे निवडणूक लढवायला पैसाही नव्हता. त्यातच डमी अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांनी पिपाणी चिन्हावर लाखांहून अधिक मते मिळवूनही गुरुजींच्या विजयामध्ये फरक पडला नाही. खरे तर भास्कर भगरे खऱ्या अर्थाने गुरुजी असले तर त्यांनी नावापुढे ते विशेषण लावले नाही. आयोगाच्या मदतीने रडीचा डाव खेळून बाबू सादू भगरे यांच्या नावासमोर मात्र सर हे विशेष लावून मतदारांत संभ्रम निर्माण केला. 

सरपंच ते खासदार 
भगरे यांचा राजकीय प्रवास एक सरपंच ते खासदार असा झाला आहे. शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले भगरे यांना उमेदवारी मिळणे आणि त्यांनी त्याचे सोने करणे ही आजच्या राजकीय विश्वातील अपूर्वाई म्हणावी लागेल. त्यांच्या यशामुळे आर. आर. पाटील यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता कसा राजकारणात यशस्वी होतो याचे स्मरण होते. व्यवसायाने शिक्षक असलेल्या भगरे यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर आपल्या वर्गात हजेरी लावली आणि तेथील घटना सांगितल्या.

शिक्षक म्हणून ३३ वर्ष नोकरी केल्यावर राजकारणात आलेले भगरे २००५ मध्ये सरपंच झाले. २००७ ते २०१७ मध्ये पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती पदावर काम त्यांनी केले आहे. जिल्हा परिषद सदस्य, तसेच तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. निफाडमधील कन्या विद्यालयात एकाच ठिकाणी त्यांनी ३० वर्षे काम केले.  प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे राजकीय घराणेशाहीचा वारसा, केंद्रातील मंत्रिपद, महायुतीचा मतदारसंघावर प्रभाव, पक्षाची बलाढ्य यंत्रणा, साधन-सामग्रीची रेलचेल तर, दुसरीकडे सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती, निवडणूक लढविण्यासाठी निधीची चणचण, पक्षाचा एकही आमदार नसणे, अशा प्रतिकूल परिस्थितीत भगरे गुरुजी जायंट किलर ठरले. त्यांना जनतेकडून मतेच नव्हे तर शक्य तितका निधीही दिला. दिंडोरीतील पाराशरी नदीकाठावरील गोंडेगाव हे त्यांचे मूळ गाव. शेती आणि शेतमजुरीवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील भगरेंनी एम. ए. बीएडपर्यंत शिक्षण घेतले. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर चारही आमदार अजित पवार गटात गेले. भगरे गुरुजी मात्र शरद पवारांबरोबर राहिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भगरे यांनी अनेक आंदोलन केली आहेत.

दिंडोरी मतदारसंघात पूर्वीच्या मालेगाव लोकसभा मतदारसंघातील भागाचा समावेश केला आहे. यात प्रामुख्यानं नांदगाव, चांदवड, कळवण, निफाड, येवला आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नांदगावमध्ये शिंदे शिवसेनेचे सुहास कांदे, चांदवडमध्ये भाजपचे राहुल अहेर, कळवणमध्ये नितीन पवार, येवल्यात छगन भुजबळ, निफाडमध्ये दिलीप बनकर आणि दिंडोरीत नरहरी झिरवळ हे चारजण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असली तरी पक्षातील फुटीमुळे हे चारही आमदार आता अजित पवारांच्या गटात गेले आहेत. या चारही जणांनी भाजपच्या पवारांच्या बाजूने आपली ताकद लावली असली तरी मूळ मतदारांनी मात्र शरद पवारांच्या गटातील उमेदवाराच्या मागे राहून आपली निष्ठा सिद्ध केली. 
 
२००९ मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली, तेव्हापासून तीन वेळा भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. मात्र, निवडून आलेले दोन खासदार मूळचे भाजपचे नव्हते तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात केलेले होते. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करत विजय मिळवला. राष्ट्रवादीत असताना कार्यकर्त्यांमध्ये बसवलेला जम आणि भाजप- शिवसेनेची साथ याचाही त्यांना फायदा झाला. चव्हाण यांना २ लाख ८१ हजार तर राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळ यांना २ लाख ४३ हजार मते मिळाली. यावेळी माकपकडून उभे राहिलेले जीवा पांडू गावित यांना १ लाख ५ हजार मते मिळाली होती. २०१४ मध्येही चव्हाण यांनीच भाजपकडून विजय मिळवताना ५ लाख ४२ हजार मते घेतली होती. यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून भारती पवार रिंगणात होत्या. त्यांना २ लाख ९५ हजार मते मिळाली होती. यावेळी माकपकडून हेमंत वाघेरे यांनी ७२ हजारांच्या आसपास मते मिळवली होती. भाजपच्या बाजूने मतदारांचा असलेला कल पाहून २०१९ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून डॉ. भारती पवार भाजपमध्ये दाखल झाल्या.

धक्कातंत्राचा वापर करून भाजपने दोन वेळा निवडून आलेल्या चव्हाण यांना उमेदवारी नाकारली. विशेष म्हणजे चव्हाण यांनी याच भारती पवारांना  २०१४ मध्ये पराभूत केलं होतं. मात्र, उमेदवारी मिळवून विजयी झालेल्या भारती पवार यांनी नंतर मंत्रिपदही मिळवले. यावेळी भारती पवार यांना ५ लाख ६७ हजार, राष्ट्रवादीचे धनराज  महाले यांना ३ लाख ६८ हजार मते  मिळाली होती. यावेळीही माकपकडून रिंगणात उतरलेल्या जीवा पांडू गावित यांनी १ लाख ९ हजार मते मिळवली होती. २०२४ ला मात्र सारे चित्र बदलले. पुन्हा उमेदवारी मिळालेल्या भारती पवार यांना ४ लाख ६४ हजार मते मिळाली. राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांना तब्बल ५ लाख ७७ हजार मते मिळाली.

दिंडोरी मतदारसंघात मुख्य पीक कांदा आहे. नाशिक जिल्ह्यात कांद्यांचं सर्वाधिक उत्पादन होत असल्याने कांदा निर्यातबंदीचा विषय वर्ष सहा महिन्यांपासून अत्यंत तापलेला होता.  भारती पवार मंत्री झाल्यानंतर त्यांचा स्थानिक पातळीवरील संपर्क कमी झाला. त्यात त्यांचे कार्यकर्ते लोकांशी बरोबर वागले नसल्याने नाराजी होती. लोक सतत कांदा निर्यातबंदीबद्दल विचारायचे. सगळे जण मोदी ब्रँडच्या प्रभावाखाली होते की, आपण जिंकून येऊ अशी भारती पवारांनाही खात्री वाटत असावी. सुरुवातीला तर खेड्यापाड्यात भारती पवारांना प्रवेशही दिली जात नसे. त्यात गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी दिली त्यामुळे कांदा उत्पादक आणखी संतापले. 

येथे आदिवासी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. त्यांच्यावर डाव्या पक्षांचा प्रभाव आहे. त्यामुळे निर्मितीपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिल्यानं याला भाजपचा गड असंही म्हटलं जातं. मात्र, राष्ट्रवादी, अन्य पक्षांचीही येथे चांगली ताकद आहे. २००९ पासून २०२४ पर्यंत माकपच्या उमेदवारांनी १ लाखांच्या आसपास मते मिळवली आहेत. यामुळे डाव्या पक्षांची एक विशिष्ट ताकद या मतदारसंघात आहे. यावेळीही माकपचे जीवा पांडुरंग गावित निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याचा फटका राष्ट्रवादीच्या भास्कर भगरेंना बसून भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा होण्याचा धोका ओळखून माकपच्या नेत्यांची समजूत काढली.  

तुतारीसदृश पिपाणीची भरारी!
अपक्ष बाबू सदू भगरे हे नाशिक तालुक्यातील असून त्यांचा दिंडोरी मतदारसंघाशी तसा संबंध नाही. विरोधकांनी रडीचा डाव खेळून नियोजनपूर्वक डुप्लिकेट उमेदवार उभा करून तिसरी शिक्षण झालेल्या उमेदवाराच्या नावापुढं सर पदवी लावली. त्याला पिपाणी निशाणी दिली गेली. मते कुणाला द्यायची तर भगरे सरांना असा लोकांचा विचार होता. त्यामुळे बाबू सदू भगरे सर यांना मतं गेली. दहा हजार खर्च करणाऱ्या उमेदवाराला एक लाख तीन हजार मतं गेली.  विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या भास्कर भगरे यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले तर बाबू भगरे यांना केवळ तुतारी हे चिन्ह मिळाले. वंचितच्या मालती ढोमसे यांना ३७ हजार मते मिळाली. मतांचे एवढे विभाजन करूनही भगरे यांनी १ लाख १३ हजारांच्या फरकाने विजय मिळवला.

शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवत असलेल्या रावेर, दिंडोरी, भिवंडी, बारामती, शिरूर, अहमदनगर, बीड, सातारा येथे तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह असून तेथे तुतारी किंवा पिपाणी हे चिन्ह अपक्षांना दिले गेले. तुतारीला दणकून मते मिळाली असून आकड्यांत सांगायचे झाल्यास रावेरमध्ये तुतारीवर निवडणूक लढवणारे एकनाथ साळुंके यांना ४३ हजार ९५७ मतं पडली आहेत. भिवंडीत कांचन वखरे यांना २४ हजार ६२५ , बारामतीत शेख सोएल शहा यांना १४ हजार ९१७, शिरूरमध्ये मनोहर वाडेकर यांना २८ हजार ३२४, अहमदनगरमध्ये गोरख आळेकर यांना ४४ हजार ५९७,  बीडमध्ये अशोक थोरात यांना ५४ हजार ८५० तर साताऱ्यात संजय गाडे यांना ३७ हजार ६२ मते पडली आहेत. साताऱ्यात भाजपचे उदयनराजे यांना ५ लाख ७१ हजार १३४ मते तर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांना ५ लाख ३८ हजार ३६३ मतं पडली. शिंदे यांना ३२ हजार ७७१ मतं कमी पडली. दुसरीकडे  तुतारी हे चिन्ह असणाऱ्या संजय गाडे या अपक्षाला ३७ हजार ६२ मते मिळाली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest