वेगळे व्हा अन् योजनेचा लाभ घ्या

योजनांच्या लाभांसाठी सासू व सुनेने कागदोपत्री वेगळे व्हावे, असा अजब सल्ला शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते व माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच मोफत गॅस सिलिंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना खोतकर यांनी हा सल्ला दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 31 Jul 2024
  • 11:14 am
Arjun Khotkar, Shiv Sena's Shinde group, Free Gas Cylinder Yojana, Majhi Ladki Bahin Yojana, Chief Minister

संग्रहित छायाचित्र

मोफत सिलिंडर मिळवण्यासाठी चलाखी दाखवा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जुन खोतकरांचा अजब सल्ला

जालना: योजनांच्या लाभांसाठी सासू व सुनेने कागदोपत्री वेगळे व्हावे, असा अजब सल्ला शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते व माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच मोफत गॅस सिलिंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना खोतकर यांनी हा सल्ला दिला आहे. खोतकर म्हणाले, एका कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर देण्याची सरकारची योजना आहे. मात्र तुम्ही महिलांनी थोडी चलाखी दाखवावी आणि सासू-सुनांनी कागदोपत्री वेगळे व्हावे, असे केल्यास तुम्हाला जास्त सिलिंडर मिळतील.

जालन्यामध्ये गायरान हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  या परिषदेला शिवसेना नेते अर्जुन खोतकर उपस्थित होते. या परिषदेला मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती. यावेळी केलेल्या भाषणात अर्जुन खोतकर यांनी उपस्थित महिलांना उद्देशून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून हा सल्ला दिला आहे. खोतकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी निर्णयांचा व योजनांचा धडाका लावला आहे. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मोफत गॅस सिलिंडर योजना सादर केली आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये मिळणार आहेत. तसेच तीन गॅस सिलिंडर मिळणार आहेत. या योजना घरातील केवळ दोन महिलांना लागू होणार होत्या. मात्र आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणालो, एका घरात एक सासू व दोन सुना असतील तर त्यांच्यात भांडणं लागतील. त्यामुळे तुम्ही असे करू नका. जेवढ्या महिला आहेत तेवढ्या सगळ्यांना या योजना देऊन टाका. एखाद्या घरात तीन सुना व एक सासू असली तरी त्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. खोतकर म्हणाले, तुम्ही आता मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झालेल्या आहात. म्हणून आता तुम्ही घरातील मंडळींकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर घरी जाऊन नवऱ्याला म्हणाल, मी आता मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे, मी आता कोणाला घाबरत नाही, असे काही करू नका. 

एका घरात १२ सिलिंडर मिळवायचे
खोतकर सर्व महिलांना म्हणाले, तुम्ही महिलांनी थोडी हुशारी दाखवायला हवी. एका कुटुंबासाठी सरकारने तीन गॅस सिलिंडर घोषित केले आहेत. मात्र तुम्ही माझे ऐका. थोडी चलाखी दाखवा. सासू व सुना वेगळ्या झाल्यात असे दाखवा. तुम्ही वेगळ्या राहू नका. परंतु, कागदोपत्री वेगळ्या व्हा. सासू-सुना वेगळ्या झाल्या तर तुम्हाला जास्त गॅस सिलिंडर मिळतील. एका घरात तीन सुना आणि एक सासू असेल तर प्रत्येकीला तीन या हिशोबाने एका घरात १२ सिलिंडर मिळतील. तसेच प्रत्येक महिलेला १५०० रुपये मिळणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest