संग्रहित छायाचित्र
बदलापूर : कोलकातातील डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्याप्रकरणाचे देशभर संतप्त पडसाद आहेत. त्यातच बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याने राज्यातील वातावरण तापले. या घटनेमुळे अख्खे बदलापूर रेल्वे रुळावर उतरले आणि त्यांनी सर्वप्रकारची रेल्वे वाहतूक रोखून आरोपीला फाशी देण्याची मागणी लावून धरली. सातत्याने विनवण्या करून, मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरही आंदोलक जुमानत नसल्याने अखेर सांयकाळी पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करत रेल्वेमार्ग मोकळा केला. यावेळी पोलिसांवर दगडफेकही झाली.
पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यावरही आंदोलक आपल्या मागणीपासून मागे हटण्यास तयार नव्हते. आरोपीला सार्वजनिक स्थळी फाशी देण्याची मागणी आंदोलक करत होते. रेल्वेमार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी त्याला दगडफेकीने उत्तर दिले. अखेर दहा तासांनंतर आंदोलक रुळावरून मागे हटले. नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केल्यामुळे मुंबई लोकलसह मेल, एक्सप्रेसची वाहतूक विस्कळीत झाली.
बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर शाळेतील शिपायाकडून लैंगिक अत्याचार झाला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई झाल्याने संतापलेल्या पालकांनी आज बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन केले. सकाळी दहा वाजल्यापासून रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू होते. बदलापूर ते कर्जत लोकलसेवा ठप्प झाली. तसेच सीएसएमटीकडे जाणारी रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली. आंदोलक क्षणाक्षणाला आक्रमक होत होते. त्यांनी आरोपीला आत्ताच भरचौकात फाशी देण्याची मागणी केली.रेल रोको केल्याने वांगणी ते कर्जत, खोपोली या भागातून ठाणे, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. सकाळी आंदोलन तीव्र झाल्याने बदलापूर पलीकडच्या नागरिकांनी घरातून काम करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे प्रशासनाने अंबरनाथ ते सीएसएमटी पर्यंत उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू ठेवली होती. कर्जत मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची वाहतूक पनवेल मार्ग वळविण्यात आली.
या प्रकरणात आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरल्याने सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन दिलं. आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो तर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेले असते का? इतर राज्यात जे घडतं ते आम्हाला आमच्या राज्यात घडू द्यायचे नाही. त्यामुळे आम्ही सरकारला फक्त सात दिवसांची मुदत देतोय. आम्ही सात दिवस इथून हलणार नाहीत, असे एका आंदोलकाने सांगितले. आम्हाला आता मुलींना बाहेर सोडायची भीती वाटतेय. शाळेत सोडायची भीती वाटते. आम्हाला सुरक्षेची चिंता आहे. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नको, सात दिवसांची मुतदही नको. आजच आरोपीला भरचौकात फाशी द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया एका महिलेने दिली.
एसआयटीमार्फत चौकशी
बदलापूरमधील संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.तसेच मंत्री गिरीश महाजन यांनीही संतप्त आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. महाजन यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन करत आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच ज्या पोलिसांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली, त्यांना सोडलं जाणार नाही. आंदोलनामुळे रेल्वे ठप्प झाली आहे. अनेक रूग्णही अडकले आहेत.संबधित कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लक्ष घालत आहेत. रेल्वे ठप्प झाल्याने हजारो लोक अडकले. त्यामुळे सरकारची विनंती आहे की आपण आंदोलन थांबवावं. शाळेकडून माफिनामा आला असून मुख्यध्यापिकेस निलंबित केले आहे.
खाकीची भीती उरली नाही : सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे याबाबत म्हणाल्या की, एखादी घटना घडल्यावर अधिकऱ्यांच्या बदल्या करून प्रकरण सुटणार नाही. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना याचे उत्तर द्यावं लागेल. बदलापूरमधील घटना फार संवेदनशील पद्धतीने हाताळावयास हवी. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की त्या मुलींची ओळख जाहीर करू नये. सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेलं पाहिजे. या प्रकरणातल्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बलात्कार करणाऱ्याला फाशी झाली तरच असं कृत्य करणाऱ्यांच्या मनात भीती बसेल. आज खाकी वर्दीची भीती उरलेली नाही, असं चित्र दिसतं. पोर्श कारप्रकरण झालं, त्यातही काय काय घडलं ते पाहिलं तर कळतं.