संग्रहित छायाचित्र
ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून (3 सप्टेंबर) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील विविध आगारांमध्ये कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक मिळावा यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
राज्यातील 251 आगारापैकी 35 आगारे पूर्णतः बंद असल्याची माहिती मिळाली आहे. तर, इतर भागातील एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे. बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्याय शोधावा लागला आहे.