संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्रात इतक्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही असे राज ठाकरेंनी म्हटले असून त्यामुळे ते वादात अडकले आहेत. मराठा समाज आणि ओबीसी समाज अशा दोन्ही समाजांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली आहे. लक्ष्मण हाके यांनी तर राज ठाकरे तुम्ही प्रबोधनकारांच्या घराण्याचे आहात का, असा बोचरा प्रश्न विचारला आहे.राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जेव्हा आरक्षणाची गरज नाही असे विधान केले. त्यानंतर राज ठाकरे धाराशिव या ठिकाणी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये सोमवारी (५ ऑगस्ट) मराठा आंदोलकांनी बराच राडा घातला होता. अखेर राज ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना शांत केले. मनोज जरांगेंनीही राज ठाकरेंवर टीका केली आहे. ज्यांना आरक्षणातले काही कळत नाही, त्यांच्यावर आम्ही काही बोलतही नाही, अशी खोचक टीका करत जरांगे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. पाठोपाठ आता लक्ष्मण हाकेंनीही राज ठाकरेंवर टीका केली आहे. मला राज ठाकरेंच्या विचारांची कीव येते. राज ठाकरे हे मनसे पक्ष संपवायला मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत का? राज ठाकरे तुम्ही खरेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्मलात का? असा संतप्त सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे.
जरांगे म्हणजे पवार !
शरद पवार हे नेहमी इलेक्शन मोडमध्ये असतात. ओबीसी समाजाचे व्याकरण ते समजतात, पण त्यांचे अंत:करण समजत नाहीत. ते समजले असते तर शरद पवार आतापर्यंत दोन-तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते. जरांगे म्हणजे पवार आणि पवार म्हणजे मुख्यमंत्री हे आता सिद्ध झाले आहे. पुढे येऊ घातलेल्या निवडणुकीतही हेच असेल. मराठ्यांनी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर जायला हवे. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत काय भूमिका घेतली आहे? ओबीसी संघटित आहेत, तो पुढेही संघटित होईल. १८ ऑगस्टला नांदेड आणि १९ ऑगस्टला सांगलीत ओबीसी मेळावा आहे. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री ओबीसीच असेल, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.