संग्रहित छायाचित्र
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध ज्या वाघनखांनी केला ती ब्रिटनमधून भारतात परत आणण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात होती. ही वाघनखे परत आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी हा ठेवा भारतास परत देण्यास मंजुरी दिली आहे. शिवरायांची वाघनखे परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ब्रिटनसोबत नुकताच एक करार केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला, तेव्हा त्यांनी वापरलेली वाघनखं ही सध्या ब्रिटनच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. हा भारताचा अनमोल ठेवा परत आणण्याची मागणी मागील बऱ्याच दिवसांपासून होत होती. ‘‘आम्हाला ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून पत्र मिळाले आहे की, त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत देण्याचे मान्य केले आहे. हिंदू कॅलेंडरनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारले त्या दिवसाच्या वर्धापनदिनानिमित्त आपल्याला ती परत मिळू शकतील. इतर काही तारखांचाही विचार केला जात असून वाघनखे परत घेण्याची नियमावली ठरवण्यात येत आहे,’’ अशी माहिती राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
‘‘सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याव्यतिरिक्त, आम्ही शिवरायांची जगदंबा तलवार यांसारख्या इतर वस्तूदेखील पाहणार आहोत, जी ब्रिटनच्या संग्रहालयात ठेवली आहे. या वस्तूही परत आणण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील. वाघनखे परतीच्या मार्गावर आहेत, ही बाब महाराष्ट्रासाठी आणि जनतेसाठी एक मोठे पाऊल आहे. अफझलखानाच्या वधाची तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार १० नोव्हेंबर अशी आहे. परंतु आम्ही हिंदू तिथी कॅलेंडरनुसार तारखा ठरवत आहोत,’’ असेही मुनगंटीवार म्हणाले.
शिवरायांची वाघनखं परत आणण्यासाठी स्वतंत्र जीआरही काढण्यात आला आहे. मंत्री मुनगंटीवार आणि खात्याचे प्रमुख सचिव विकास खरगे हे दोघे २९ सप्टेंबरला लंडनला जाणार असून वाघनखं आणण्यासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
छत्रपती शिवरायांनी वापरलेली ही वाघनखे पूर्वी त्यांच्या साताऱ्यातील वंशजांकडे होती. १८१८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स ग्रँट डफ यांची निवासी अधिकारी (राजकीय हस्तक) म्हणून नेमणूक सातारा येथे होती. तेव्हा पेशव्यांकडून ही वाघनखं जेम्स ग्रँट डफ या ब्रिटिश अधिकाऱ्याला देण्यात आली. दरम्यान डफ यांनी सातारा येथे १८१८ ते १८२४ या काळात काम केलं. त्यानंतर ते ही वाघनखं ब्रिटनला सोबत घेऊन गेले. त्यानंतर पुढे या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या वंशजांकडून शिवरायांची ही वाघनखं ब्रिटनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाला देण्यात आली.