एमपीएससीचा उदासीन कारभार, विद्यार्थी नैराश्यात

अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी गावातून शहराचा रस्ता धरतात. शहरात आल्यानंतर दोन ते तीन वर्षांत अधिकारी होऊन पुन्हा ताठ मानेने घरी परतायचे, असे ध्येय मनात बाळगले असते.

संग्रहित छायाचित्र

आयोगातील अंतर्गत राजकारणाचा बसतोय फटका, परीक्षांचा अभ्यासक्रम, मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा आणि निकालही रखडला

अमोल अवचिते:
अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी गावातून शहराचा रस्ता धरतात. शहरात आल्यानंतर दोन ते तीन वर्षांत अधिकारी होऊन पुन्हा ताठ मानेने घरी परतायचे, असे ध्येय मनात बाळगले असते. मात्र हे स्वप्न धुळीस मिळविण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) केले जात आहे. एमपीएससीने (MPSC) अनेक रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र त्या परीक्षांचा अभ्यासक्रम दीड वर्षे उलटून गेल्यानंतरही जाहीर केला नाही. तसेच विविध पदांच्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि निकाल रखडून ठेवले असल्याचे समोर आले. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नैराश्य आले आहे.  

‘सीविक मिरर’ने एमपीएससीअंतर्गत स्पर्धा परीक्षांची (Competitive Exam) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून वास्तव जाणून घेतले. या सर्वेक्षणामध्ये सुमारे ४५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘सध्या आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कोणत्या जिल्ह्यात करत आहात?,’ ‘एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्या परीक्षा रखडल्या आहेत? (परीक्षेचे नाव, किती महिन्यांपासून प्रलंबित आहे?),’ ‘कोणत्या परीक्षांचा अभ्यासक्रम जाहीर झालेला नाही? (परीक्षेचं नाव, वर्ष),’ ‘कोणत्या परीक्षांच्या मुलाखती रखडल्या आहेत?  (परीक्षेचं नाव व किती महिन्यांपासून प्रलंबित आहे),’ ‘कोणत्या परीक्षांचे निकाल रखडले आहेत? (परीक्षेचं नाव आणि वर्ष),’ ‘कोणत्या परीक्षांच्या मुख्य परीक्षा बाकी आहे? (परीक्षेचं नाव व किती महिन्यांपासून प्रलंबित आहे),’ ‘मंत्रालयातून एमपीएससीमध्ये प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी दबाव टाकत असल्याची चर्चा आहे,  त्यावर तुमचे मत काय?’  असे प्रश्न घेऊन ‘सीविक मिरर’ने गुगल फॉर्म तयार केला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांना या सर्वेक्षणाला प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यावर ४५० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत माहिती दिली. या प्रश्नांच्या मिळालेल्या उत्तरांमधून एमपीएससीच्या उदासीन कारभार समोर आला आहे.  

एमपीएससीतील अंतर्गत वाद ‘सीविक मिरर’ने उघडकीस आणला होता. मंत्रालयातील प्रतिनियुक्तीवरील आलेल्या अधिकाऱ्यांकडून एमपीएससीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. त्यांच्या हेकेखोर वागण्यामुळे एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या नियोजनावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे दीड ते तीन वर्षांपासून परीक्षा प्रक्रिया रखडली असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या वयाचा विचारदेखील एमपीएससीकडून होत नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भविष्य अंध:कारमय दिसत असल्याने हे विद्यार्थी नैराश्यात आहेत.

एमपीएससीचा गतीमान कारभार राज्यातील विद्यार्थ्यांनी पाहिला होता. मुलाखत घेतल्यानंतर त्याच दिवशी निकाल लावण्याचा इतिहास एमपीएससीच्या माजी अध्यक्षांनी रचला होता. वेळापत्रकाची तंतोतंत अंमलबजवणी, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था तसेच कोविडकाळात यशस्वी भरतीप्रक्रिया यशस्वी करून दाखविली. माग आताच एमपीएससीचा कारभार का संथ गतीने सुरू आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

निकाल प्रलंबित असलेल्या परीक्षा :

एमपीएससी न्यायिक सेवा (जेएमएफसी) परीक्षा-२०२३, पूर्व परीक्षा ९ सप्टेंबरला झाली. निकाल नाही.  मुख्य परीक्षेची तारीख अद्याप जाहीर नाही

पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय-२०२२) पदाची मुख्य परीक्षा घेण्यात आली, मात्र निकाल रखडला आहे

मंत्रालय सहायक, पीएसआय, विक्रीकर निरीक्षक, एसआर (अराजपत्रित गट -ब २०२३), गेल्या चार महिन्यांपासून निकाल रखडला

एमपीएससी सहायक आयुक्त, बीएमसी

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंड अधिकारी गट अ २०२२ (पूर्व परीक्षा)

खात्यांतर्गत पीएसआय २०२३ पूर्व परीक्षा

दंत शल्यचिकित्सक (गट ब)

मुलाखती रखडलेल्या परीक्षा :

प्रशासकीय अधिकारी सामन्य राज्यसेवा गट ब

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग

एमपीएससी (सहायक प्राध्यापक भरती २०२३)

पीएसआय २०२२

तालुका क्रीडा अधिकारी

रखडलेल्या परीक्षा :  

औषध निरीक्षक  (अडीच वर्षांपासून)

महाराष्ट्र वन सेवा गट अ (५ महिन्यांपासून)

सहायक आयुक्त भरती (एक वर्षापासून)

सहायक नगर रचनाकार श्रेणी १ (दीड वर्षांपासून)

कनिष्ठ भूवैज्ञानिक आणि सहायक भूवैज्ञानिक (१५ महिन्यांपासून)

सहायक संचालक गट अ

अधीक्षक, सामान्य राज्यसेवा गट ब (१४ महिन्यांपासून)

वरिष्ठ संशोधन अधिकारी (जाहिरात क्रमांक १५/ २०२०)

प्रशासकीय अधिकारी (२४/२०२२)

सहायक प्रशासकीय अधिकारी (५५/२०२२)

प्रशासकीय अधिकारी (७९/२०२२)

प्रशासकीय अधिकारी (१०५/२०२१)  

अभ्यासक्रमच प्रसिद्ध नाही :

अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्यसेवा गटब (प्रशासक), (जाहिरात क्रमांक ९०/ २०२२) गेल्या १५ महिन्यांपासून कोणतीही माहिती दिलेली नाही

कनिष्ठ भूवैज्ञानिक गट ब, सहायक भूवैज्ञानिक गट ब

सहायक संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय (१ वर्षापासून)

अधिव्याख्याता गटब (जाहिरात क्रमांक ११५/२०२३)

या परीक्षांची जाहिराती प्रसिद्ध, परंतु पुढे काय?

भूवैज्ञानिक गट अ खनिकर्म  (जाहिरात दिनांक २१/०९/२०२२, १११/२०२२, ११२/२०२२)  आणि पाणीपुरवठा विभाग अंतर्गत असलेले भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाची कनिष्ठ भूवैज्ञानिक गटब, सहायक भूवैज्ञानिक ग ब अनुक्रमे दिनांक १९ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध होऊन दीड वर्ष उलटून गेले आहे. तसेच १३४/२०२३ सहायक भूभौतिकतज्ज्ञ ५ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द होऊन या परीक्षांबाबत एमपीएससीने अद्यापी कोणतीही माहिती दिलेली नाही. या बाबत विचारले असता, कोणतीही माहिती देता येणार नाही. असे एमपीएससीच्या सचिव सांगतात, अशी माहिती विद्यार्थ्यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा २०२३ या पदाची जाहीरात कधी?

एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकात  महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा २०२३ या पदाची जाहिरात फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रसिद्ध केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र मार्च महिना उजाडला तरी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे जाहिरात कधी येणार? तसेच १६ जूनला होणारी पूर्व परीक्षा वेळेत होणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. एमपीएससीने अलीकडे मुख्य परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याचे बंद केले आहे. त्यामुळे योग्य नियोजन होत नसून अधिकारी जबाबदारी टाळत आहेत का, असाही प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.

झारीतील शुक्राचार्य कोण?

परीक्षा नियंत्रक पद नसतानादेखील या पदावर नियुक्ती दिली जात आहे. तसेच सेवा कालावधी संपूनदेखील मुदतवाढ देण्यामागे नेमके कारण काय आहे? तसेच या व्यक्तीच्या माध्यमातून एमपीएससीच्या परीक्षांवर नियंत्रण आणून संस्थेवर अप्रत्यक्ष दबाव टाकणारा आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणारा झारीतील शुक्राचार्य कोण, याचा शोध एमपीएससीचे अध्यक्ष घेणार का, असा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

एमपीएससीच्या अध्यक्षांना विद्यार्थ्यांचे प्रश्न

-  एमपीएससीकडून रखडलेल्या परीक्षांचे नियोजन कधी होणार ?

-  कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?

-  एमपीएससीच्या ढिल्या कारभाराचा खुलासा कधी करणार ?  

 

एमपीएससीच्या उदासीन कारभारामुळे तसेच अंतर्गत राजकारामुळे भरती प्रक्रियेचे नियोजन कोलमडले आहे. या पूर्वीच्या अध्यक्षांनी एका दिवसात निकाल लावला होता. मात्र आताच एमपीएससीचा कारभार का संथ झाला आहे? एमपीएससीतील अंतर्गत राजकारणामुळे विद्यार्थी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एमपीएससीच्या अध्यक्षांनी यामध्ये लक्ष घालून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून एमपीएससीचा कारभार पुन्हा गतीमान करावा. त्यांनी रखडलेल्या परीक्षांचे वेळापत्रक रुळावर आणून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.

 - स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest