पुणे हिंसाचारप्रकरणी नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकरांविरुद्ध होते सबळ पुरावे
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी पुणे हिंसाचारावेळी (Pune violence)घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करत नीलम गोऱ्हे,(Neelam Gorhe) मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या विरोधात सबळ पुरावे होते, असा गौप्यस्फोट करीत खळबळ उडवून दिली.
मीरा बोरवणकर म्हणाल्या की, ‘‘पुणे बंदमध्ये हिंसाचार कसा करावा याबाबत महत्त्वपूर्ण पुरावा हाती लागला होता. त्यावेळी नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा होता. त्यावेळी आमच्याकडे सज्जड तांत्रिक पुरावा होता. तेव्हा अधिकारी मला म्हणाले की, ‘मॅडम गुन्हा दाखल करू नका, तुम्हाला मुंबई पोलीस आयुक्तपदी पाहण्याची आमची इच्छा आहे.’ त्यामुळे त्यावेळी मी खूप दबावाखाली होते. आपण जर असे केले तर आपल्याला मुंबईचे पोलीस आयुक्तपद देण्यात येणार नाही, हे मला माहीत होते.’’
सध्याच्या परिस्थितीत राजकीय नेते पॉवरफुल झालेले आहेत आणि आम्ही पोलीस प्रशासक बदल्या आणि पोस्टिंगसाठी राजकीय नेत्यांवर अवलंबून राहिलो आहोत. ही समाजासाठी चांगली बाब नाही, असे बोरवणकर यांनी आवर्जून नमूद केले.
‘‘अजित पवार यांनी येरवडा येथील लिलाव केला नाही, हे सत्य आहे. पुणे पोलिसांच्या अखत्यारित असलेल्या जमिनीच्या लिलावासाठी सरकारने एक समिती नेमली होती. त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली. माझ्याकडे कार्यभार असल्याने या जमिनीवरील ताबा सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती. अजित पवारांनीदेखील हाच आग्रह धरला होता. लिलाव झाल्याने आता हस्तांतरण प्रक्रिया सुरू करा असे त्यांनी म्हटले. मात्र, माझ्या दृष्टीने ती जागा महत्त्वाची होती. पुणे पोलीस आयुक्तालय, पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी ही जागा वापरता आली असती. त्यामुळे मी त्या तीन एकर जमिनीच्या लिलावाला आक्षेप घेत हस्तांतरणाला विरोध केला होता. पुणे पोलिसांना हा प्रस्ताव मान्य नाही, असं मी तेव्हा शासनाच्या निदर्शनास आणून दिले. आम्ही तीन एकर जागा देण्यास तयार नसल्याने शासनाने आदेश मागे घेतले. माझ्या विरोधाची किंमत मला नंतर चुकवावी लागली. पण वाईट वाटले नाही. कारण तो निर्णय योग्य होता, असेही बोरवणकर यांनी सांगितले.