संग्रहित छायाचित्र
अमोल अवचिते
पुणे: महाराष्ट्र् लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीसाठी आपली निवड झाली आहे. आपली मुलाखत झाली आहे. आपले नाव आम्हाला एमपीएससीच्या सदस्यांकडून समजले आहे. मुलाखतीमधील गुण वाढविण्यासाठी आम्ही मदत करु शकतो. आपली इच्छा असल्यास आपण संपर्क साधू शकता. असे फोन गेल्या महिन्या-दोन महिन्यात उमेदवारांना आले असल्याची धक्कादायक आणि खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेवून एमपीएससीने तात्काळ या प्रकरणाची चौकशी करावी. अशी मागणी स्टूडंट्स राईट्स असोसिएशनने एमपीएससीच्या (MPSC) अध्यक्षाकडे केली आहे
एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी मुलाखत देणे बंधनकारक आहे. भरती प्रक्रियेमध्ये मुलाखतीचा टप्पा अतिशय महत्वाचा असतो. मुलाखतीवर अंतिम निवड ठरते. त्यामुळे उमेदवार मोठी मेहनत घेवून मुलाखतीची तयारी करत असतात. हीच उमेदवारांची दुखरी नस पकडून काही त्रयस्त व्यक्तीकडून मुलाखतीसाठी आपल्याला मदत केली जाईल. असे सांगून एमपीएससीच्या सदस्यांची नावे सांगितले जात आहेत. निनावी फोनद्वारे मुलाखतीमध्ये गुण वाढवून देतो. तुमच्या मुलाखतीच्या पॅनेलमध्ये आमुक सदस्य असणार आहेत. आमची त्यांच्यासोबत ओळख आहे असे सांगितले जात आहे. हा प्रकार मागील काही महिन्यांपूर्वी संपन्न झालेल्या राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीमधील उमेदवारांना मुलाखतीच्या काही दिवस आधी व काही उमेदवारांना मुलाखत झाल्यानंतर घडला आहे. एमपीएससीतील सदस्यांचे नाव घेवून निनावी कॉलद्वारे उमेदवारांशी संपर्क साधण्यात आला आहे. या प्रकारामुळे उमेदवारांमध्ये भीती पसरली आहे. भीतीपोटी उमेदवार बोलत नव्हते. मात्र नैराश्य येत असल्याने काही उमेदवारांनी असोसिएशशी संपर्क साधून हा प्रकार घडल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. याची दखल घेत असोसिएशने ही बाब एमपीएससीच्या निदर्शनास आणून दिली आहे.
एमपीएससी या स्वायत्त संस्थेवर राज्यातील लाखो उमेदवारांचा विश्वास आहे. त्याला अशाप्रकारे कोणी गैरकृत्य करुन त्या विश्वासाला तडा लावत असल्यास एमपीएससीने याबाबत हे प्रकरण गंभीरपणे हाताळावे. उमेदवारांचे मोबाईल नंबर कसे काय उपलब्ध होत आहेत ? कोणत्या पॅनलला तुमची मुलाखत येणार आहे हे सांगितले जात आहे. अशी गोपनीय माहिती कशी काय बाहेर येत आहे. कोणत्या अधिकाऱ्याच्या संमतीने ही माहिती बाहेर येत आहे. याचा शोध घेणे महत्वाचे आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून आयोगाने याबाबत एक समिती गठीत करुन चौकशी करून शोध घ्यावा. सन २००२ मध्ये एमपीएससीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात एमपीएससीची झालेली बदनामी ही कधीही भरून निघणारी नाही. त्यानंतर एमपीएससीने असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी घेतलेले परिश्रम व त्यानंतर एमपीएससीला मिळालेला मानसन्मान वायाला जावू नये एवढी अपेक्षा आहे.एमपीएससीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत याची चौकशी करावी, या आशयाचे पत्र असोसिएशने दिले आहे. आता यावर एमपीएससी काय भुमिका घेणार याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यसेवेची मुलाखत झाल्यानंतर एक निनावी फोन आला होता. त्यावेळी तुम्ही मुलाखत दिली आहे. आणखी गुण वाढवून देण्यासाठी मदत करु शकतो. असे त्यांनी सांगितले. यामुळे भीती वाटली. ही माहिती कोणाला सांगू की नको असे झाले होते. मात्र असोसिएशनकडे ही माहिती दिली. असे एका उमेदवारे सांगितले.
अनुभव प्रमाणपत्र नसताना झाली होती एकाची निवड...
राज्याच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सहायक संचालक व उपसंचालक यांची पद भरती करण्यात आली होती. यामध्ये अनुभवांच्या अटींची पुर्तता न करणाऱ्या उमेदवाराचीही निवड झाली होती. त्यामुळे एमपीएससीच्या कारभारा विरोधात काही उमेदवारांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटने दिलेल्या आदेशाने चार जणांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे एमपीएससीची नाचक्की झाली होती. असे प्रकार घडत असल्याने असे निनावी फोन खरच आले आहेत का..? की कोणी मुद्दाम करत आहे. याची चौकशी व्हावी. अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
एमपीएससीतील सध्याचे परीक्षा परीक्षा नियंत्रणक पद बेकायदा...
एमपीएससीमध्ये सध्या परीक्षा नियंत्रणक पद तयार करुन त्याची जबाबदारी उपसचिवावर देण्यात आली आहे. हे अधिकारी मंत्रालयातून प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत. त्यांची इच्छा नसताना देखील त्यांना एमपीएससीमध्ये राज्य शासनाने नियुक्ती दिली आहे. तसेच हे अधिकारी गोपनीय विभागात काम करत आहेत. निनावी फोन येत असल्याने विद्यार्थ्यांची गोपनीय माहितीचा भंग होत आहे. मुलाखतीला निवड झालेल्या उमेदावारांची माहिती आणि त्यांचे फोन नंबर नेमके कोण बाहेर काढत आहेत. याची जबादारी कोणाची याची देखील चौकशी झालीच पाहिजे असे आता उमेदवारांचे म्हणणे आहे.
कर्णिक घोटाळ्याची पुनरावृ्त्ती..?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी प्रमुख शशिकांत डी. कर्णिक यांचे कोट्यवधी रुपयांच्या भरती घोटाळा प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. या प्रकरणामुळे एमपीएससीची मोठी बदनामी झाली होती. त्यानंतर एमपीएससीच्या आतापर्यंतच्या सर्व अध्यक्षांनी चांगले काम करुन एमपीएससीचे नाव आणि दर्जा उंचावला आहे. मात्र आता पु्न्हा काही अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे एमपीएससीवर शिंतोडे उडू लागले असून निनावी फोन प्रकरणामुळे पुन्हा कर्णिक घोटाळ्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात असून वेळीच याची चौकशी करुन एमपीएससीने खुलासा करावा, अशी मागणी राज्यातील उमेदवारांची आहे.
एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी असोसिएशने काम केले आहे. त्यामुळे असोसिएशनवर विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. अनेक प्रश्न असोसिएशनकडे मांडले जातात. असेच प्रश्न मांडण्यासाठी काही विद्यार्थी आले होते. त्यावेळी ते खूप घाबरलेले होते. एमपीएससीतील सदस्यांची नावे सांगून फोन येत आहेत. असे त्यांनी सांगितले. मुलाखतीसाठी मदत करु असे सांगितल्याने मनामध्ये भीती भरली आहे. आम्ही कोणताही प्रतिसात दिलेला नाही. त्यामुळे आता आमची निवड होईल का, असा प्रश्न पडला. असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ एमपीएससीच्या अध्यक्षांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.
- महेश बडे, स्टूडंट्स राईट्स असोसिएशन