आंबेडकरांची थेट मुख्यमंत्र्यांनाच ऑफर!
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Alliance) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच आपल्यासोबत येण्याचे निमंत्रण दिले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक नवे समीकरण अस्तित्वात येते की काय, यावर चर्चा सुरू झराली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी वाशिम येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्यासोबत येण्याचे निमंत्रण दिले. ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची ऑफर आहे. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमच्यासोबत यावे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही आमच्यासोबत आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत यायचे की नाही हे ठरवावे,’’ असा सशर्त प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी ठेवला आहे.
या पत्रकार परिषदेला प्रा. अंजली आंबेडकर, अरुंधती शिरसाट, पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे, जिल्हाध्यक्ष किरनताई गिऱ्हे, डॉक्टर वैशालीताई देवळे, ज्योतीताई इंगळे, इरफान कुरेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले.
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुनही एकनाथ शिंदेंचे कौतुक केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील सर्वच नेत्यांना बाजूला सारून मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. यामुळे ते मराठा समाजाचे हिरो ठरले आहेत. आता मराठा समाजाची त्यांच्याप्रती सहानुभूती वाढली आहे, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे मराठा समाजाचे एक मजबूत नेते बनले आहेत. त्यांनी सगळ्यांना क्लीन बोल्ड केले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे, असेही आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.
मुस्लिम मतदारांनी आता काँग्रेससोबत जाऊ नये. कारण, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस एकटी लढली, तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त होईल. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. पण त्यांच्यात जागावाटपावरून अद्याप एकमत झाले नाही, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीने पुढील १५ दिवसांत जागावाटपाचा निर्णय घेतला नाही, तर त्यांचेही हाल इंडिया आघाडीसारखेच होतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात इंडिया आघाडी तयार झाली होती. पण ती अस्तित्वात आली तेव्हाच ती फुटणार असल्याचे निश्चित झाले होते. कारण, त्याचे रिंगमास्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होते, असा दावाही आंबेडकर यांनी केला.