संग्रहित छायाचित्र
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास होत असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहू शकणार नाहीत. याबाबत राष्ट्रपती महोदयांच्या कार्यालयाला अवगत करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील काही महिन्यांपासून जनसन्मान यात्रा, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची भेट, शासकीय बैठका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने सातत्याने राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत. आज त्यांचा राष्ट्रपती महोदयांसोबत उदगीरचा दौरा होता. परंतु ‘ब्रॉन्कायटीस’चे निदान झाल्याने उपमुख्यमंत्र्यांना त्यांचा उदगीर दौरा रद्द करावा लागत आहे. प्रकृतीत सुधारणा होताच ते लवकरच पुन्हा दौरे सुरु करतील. दरम्यानच्या काळात मुंबईतील शासकीय निवासस्थान येथून शासकीय कामकाज पाहणार आहेत, असेही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने कळविले आहे.